Talegaon News: मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी आमदार शेळके यांची एकमताने निवड

एमपीसी न्यूज – मावळ शिक्षण प्रतिष्ठान या अग्रगण्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी आमदार सुनील शेळके यांची आज (मंगळवारी) एकमताने निवड करण्यात आली. ही निवड पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. कृष्णकांत वाढोकर, यादवेंद्र खळदे, कान्हू पडवळ, नंदकुमार शेलार, वसंत पवार, संजय भालेराव, नानासाहेब जगताप, दत्तात्रय बाळसराफ, नंदकुमार काळोखे, चंद्रकांत काकडे, वसंत भावे, संजय माळी उपस्थित होते.

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णकांत वाढोकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य यादवेंद्र खळदे यांनी अध्यक्षपदासाठी आमदार शेळके यांचे नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला चंद्रकांत काकडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने आमदार शेळके यांच्या निवडीला मान्यता दिली.

या संस्थेच्या वतीने आदर्श विद्या मंदिर (तळेगाव दाभाडे),  श्री पद्मावती विद्यामंदिर (उर्से), श्री भैरवनाथ विद्यालय (वराळे), प्रतिक विद्या निकेतन (निगडे) या शाळा चालविण्यात येतात. या संस्थेच्या माध्यमातून सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

मागील 30 वर्षांपासून मावळ तालुक्यात गुणवत्तापूर्ण ज्ञानदानाचे कार्य संस्था अविरतपणे करीत आहे. कृष्णराव भेगडे यांच्या सूचनेनुसार माझ्यावर विश्वास दाखवून सर्वांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली त्याबद्दल आमदार शेळके यांनी सर्वांचे आभार मानले. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य विद्यार्थी केंद्रस्थानी मानून शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करु, असे आमदार शेळके म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.