Talegaon News: इंग्रजी शाळांच्या दबावाला बळी पडून पालकांनी फी भरण्याची घाई करु नये – आमदार शेळके

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे अनेक पालक आर्थिक संकटात असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी फी वसुलीचा तगादा लावला आहे. सोमवारपर्यंत फी सवलतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, त्यामुळे मावळ तालुक्यातील पालकांनी गोंधळून न जाता, शाळांच्या दबावाला बळी न पडता फी भरण्यासाठी घाई करु नये, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांची आर्थिक गणिते कोलमडल्याने अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार बंद असल्याने अनेक पालकांकडे पैसे नाहीत, अशा परिस्थितीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी शालेय फी साठी पुन्हा तगादा लावला आहे. फोन, मेसेजद्वारे अनेक शाळांनी तशा सूचना दिल्याचे समजते आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे पालकांना आवाहन केले आहे.

बालविकास शाळेतील पालकांनी मोठ्या संख्येने जमून नगरसेवक अरुण माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. विद्यार्थ्यांना फी सवलत मिळवून देण्यासाठी सुरु असलेल्या अरुण माने यांच्या लढ्याला माझी साथ असल्याचे शेळके यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर आगामी शैक्षणिक वर्षाचे ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू झाले आहेत. प्रत्यक्षात शाळा सुरू होण्यास अजून कालावधी आहे. मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी फी वसुलीचा पुन्हा तगादा लावला आहे. ठराविक तारीख देऊन त्यापूर्वी शुल्क भरण्याचा आग्रह केला जात आहे. फी न भरलेल्या पाल्यांना शिक्षण सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे पालकांना नाईलाजाने पाल्यांच्या भवितव्याकडे पाहून फी भरावी लागत आहे, असे शेळके यांनी पत्रकात म्हटले आहे.

लॉकडाऊनमधून सावरत असतानाच अशा परिस्थितीत शाळांनी फी मध्ये सवलत देणे आवश्यक आहे. परंतु टप्प्या टप्प्याने का होईना शाळांकडून फी वसूल केली जात आहे. काही शाळांनी तर पालकांना आवाहन करुन ज्यांना शक्य आहे त्यांनी फी भरावी. शक्य नसल्यास सहामाही किंवा टप्प्याने भरावी, असे आवाहन केले आहे. काही शाळा मात्र फी सवलतीबाबत पालकांना बोलू देखील देत नाही. ही बाब संतापजनक आहे, असे शेळके यांनी म्हटले आहे.

शाळांच्या फीबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्यास शाळा आपल्या पाल्याला त्रास देईल.अशा भीतीने कोणी पालक तक्रारी करण्यास पुढे येत नाही. याचाच गैरफायदा इंग्रजी माध्यमांच्या शाळा घेत आहेत, असा आरोप आमदार शेळके यांनी केला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांना फी सवलत मिळण्याबाबत सोमवारपर्यंत सकारात्मक निर्णय होणार असल्याने पालकांनी शाळांच्या दबावाला बळी पडून फी भरण्याची घाई करू नये, असे आवाहन शेळके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.