Talegaon News : गंगा पेपर्स कंपनीत मृत्यू झालेल्या ‘त्या’ कामगाराच्या कुटुंबीयांची विरोधी पक्षनेत्यांकडे धाव

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील बेबडओहळ येथील गंगा पेपर्स मिल या कंपनीत 1 सप्टेंबर 2020 रोजी एका कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला. हा प्रकार घातपाताचा असून कंपनी संचालक आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, याबाबत कामगाराच्या कुटुंबीयांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्या माध्यमातून विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन दिले आहे. कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रकरणाची दखल घेणार असल्याचे आश्वासन दरेकर यांनी दिले.

अनुकूल अनिल लाहा (वय 43, रा. बेबडओहळ, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांची पत्नी मानसी अनुकूल लाहा आणि मुलगी सोनिया अनुकूल लाहा यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन दिले.

कामगाराच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगार अनुकूल लाहा हे बेबडओहळ येथील गंगा पेपर मिल या कंपनीत फर्स्ट असिस्टंट या पदावर सन 2006 पासून काम करत होते. त्यांची आणखी 15 वर्ष सेवा शिल्लक होती. ते कंपनीत प्रामाणिकपणे काम करत होते. कामगारांवर लक्ष ठेवणे, कामगारांकडून काम करून घेणे हे त्यांच्या कामाचे स्वरूप होते.

कंपनीने तांत्रिक बिघाड अथवा अन्य बाबींसाठी फिटर या पदावर कामगार नेमला आहे. असे असताना तसेच 1 सप्टेंबर 2020 रोजी फिटर कामावर असताना मशीन बंद पडल्याने अनुकूल यांना सायलो टँककडे पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांचा टँकमध्ये पडून मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ‘अनुकूल यांचा मृत्यू सायलो टँकमध्ये पडून फॅन, पंपामध्ये अडकून झाला असावा’ अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अनुकूल यांचा मृत्यू अपघाताने नव्हे तर घातपात झाल्याने झाला असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

अनुकूल यांचा मृत्यू झाला त्यावेळी कंपनीत फिटर हजर होता. असे असताना अनुकूल सायलो टँकची पाहणी करण्यासाठी एकटे गेले ही संशयाची बाब आहे. त्यामुळे कंपनीचे प्लांट मॅनेजर द्विवेदी, जनरल मॅनेजर गांगोली, पर्सनल मॅनेजर यतीन द्विवेदी, प्रोडक्शन मॅनेजर दिनेश मिश्रा आणि तीन कामगार यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

तसेच अनुकूल यांच्यामागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. घरात सर्व महिला असून कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला आहे. त्यामुळे या कुटुंबाला न्याय्य नुकसान भरपाई द्यावी. नुकसान भरपाई मिळेपर्यंत अनुकूल यांच्या कुटुंबियांना कंपनीच्या परिसरातील घरात राहू द्यावे, अशा मागण्या कुटुंबीयांनी केल्या आहेत.

याबाबत कुटुंबीयांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. या प्रकरणी त्यांना निवेदन दिले. त्यावर या प्रकरणाची दखल घेणार असल्याचे आश्वासन दरेकर यांनी कामगाराच्या कुटुंबियांना दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.