Talegaon News : भर पावसात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये एरंडाची झाडे लावून निषेध

एमपीसीन्यूज : तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीने चाकण एमआयडीसीत तळेगाव-चाकण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये भर पावसात एरंडाची झाडे लावून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला.

शनिवारी (दि 19) दुपारी तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, सचिव अमित प्रभावळकर, सदस्य प्रमोद दाभाडे, सचिन गाडे, बंटी गाडे, प्रतीक गायकवाड, अभिजित गाडे, प्रतीक गाडे आदी कार्यकर्त्यांनी चाकण एमआयडीसीतील कला जनसेट कंपनीसमोर पडलेल्या खड्ड्यात उभे राहून रास्ता रोको करून रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यात एरंडाची झाडे लावण्यात आली.

कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे म्हणाले कि, तळेगाव-चाकण महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण उडाली असून, पावसाचे पाणी तुंबल्याने या रस्त्याची गटारासारखी अवस्था झाली आहे. कार आणि दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता जिवघेणा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जबाबदारी झटकत या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

खेड व मावळचे खासदार या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत हे दुर्दैव आहे. गेल्या पाच वर्षांत अडीशेपेक्षा अधिक निष्पाप बळी या रस्त्याने घेतले.वारंवार आंदोलनाचा इशारा देऊनही रस्त्याच्या कामासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने सदर रस्त्यावरील खड्ड्यांची आठवडाभरात पक्की दुरुस्ती न केल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही कृती समितीने दिला आहे.

समितीच्या कार्यकर्त्यांनी धो -धो पावसात भिजत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या. आंदोलनामुळे एचपी चौक ते म्हाळुंगेपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.