Talegaon : गावठी दारुभट्टीवर पोलिसांचा छापा; दीड हजार लिटर रसायन केले उध्द्वस्त

एमपीसी न्यूज – गावठी दारुभट्टीवर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. त्यात सुमारे 1 हजार 400 लिटर दारू बनविण्याचे रसायन पोलिसांनी उध्द्वस्त करत दोन महिलांना ताब्यात घेतले. ही कारवाई आंबी गावच्या हद्दीत अंधेरी ओढ्याजवळ करण्यात आली.

इतासना पुरुषोत्तम राठोड (वय 21), खुशवा विश्वनाथ राठोड (वय 22, दोघी रा. कंजारभाटवस्ती, आंबी, ता. मावळ) अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत. पुरुषोत्तम लाला राठोड (वय 28) हा आरोपी पोलिसांना पाहून पळून गेला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबी येथील अंधेरी ओढ्याजवळ गावठी दारू बनविण्याची भट्टी सुरू आहे, अशी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अंधेरी ओढ्याजवळ भेट दिली. त्यावेळी दोन लोखंडी कढया आणि चार लोखंडी बॅरेल जमिनीत पुरून ठेवल्याचे आढळून आले. त्यामध्ये दारू बनविण्याचे कच्चे रसायन होते. तिन्ही आरोपी दारूभट्टी पेटविण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांचा एक साथीदार पळून गेला.

पोलिसांनी करवाईमध्ये एकूण दोन लोखंडी कढया, चार लोखंडी बॅरेल आणि 1 हजार 400 लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन असा एकूण 64 हजार रुपयांचा ऐवज नष्ट केला. आरोपींवर महाराष्ट्र प्रॉव्हिबिशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.