Pimpri : सिंचन पुर्नस्थापन खर्चापोटी जलसंपदा विभागाला 45 कोटी रुपये देण्यास महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसाठी पवना, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून 149 दशलक्ष घनमीटर पाण्याचा कोटा मंजूर झाला आहे. धरण पुनर्स्थापनेसाठी पालिकेला सुमारे 300 कोटी रुपये पुढील पाच वर्षात टप्प्या-टप्प्याने समान हप्त्यांमध्ये भरावे लागणार आहेत. त्यापैकी 45 कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार असून अर्थसंकल्पात शहराच्या अन्य विकासकामांसाठी तरतूद रक्कमेतून 45 कोटी रुपये वर्गीकरणास आज (बुधवारी) महासभेने मंजुरी दिली. 

महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातील 48.576 दलघमी एवढा पाणीसाठ्याला पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. तसेच शहरासाठी आंद्रातून 36.87 दलघमी आणि भामा आसखेडमधून 60.79 दलघमी पाणी आरक्षणास राज्य सरकारने 23 ऑक्टोबर रोजी मुदतवाढ दिली आहे.

आंद्रा-भामातील पाणी घेण्यासाठी महापालिकेला शासनास सिंचन पुर्नस्थापना खर्च म्हणून सुमारे 238 कोटी देणे बंधनकारक आहे. यापूर्वी शासनाने ही रक्कम एक रक्कमी देण्याची मागणी केली होती. परंतु, ही रक्कम आता 2018-19 पासून पुढील 5 वर्षांत टप्याटप्याने भरण्यास मंजुरी दिली.

या तीनही धरणातील पाणी उचलण्याच्या मोबदल्यात जलसंपदा खात्याला तातडीने 45 कोटी रुपये दिले जाणार आहेत. बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत 45 कोटी रुपयांच्या वर्गीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता  जलसंपदा विभागाशी करारनामा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.