Maval News : बंदी उठल्यानंतर प्रथमच मावळात 11 व 12 फेब्रुवारीला होणार राज्यातील सर्वात भव्य बैलगाडा शर्यत

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने तळेगाव एमआयडीसीत भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत उद्या व परवा (शुक्रवारी,शनिवारी) तळेगाव दाभाडे एमआयडीसीजवळ नाणोली तर्फे चाकण येथे होणार आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडा शर्यतीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे नाणोलीच्या दत्त जयंती उत्सवात तब्बल आठ वर्षांनी बैलगाडे दि 1 जानेवारीला धावणार होते. तथापी कोरोना निर्बंधामुळे ती स्पर्धा रद्द करण्यात आली होती. आता निर्बंध शिथिल झाल्याने बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बैलगाडा शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर राज्यात प्रथमच बैलगाडा शर्यतींचा घाट भरत असून हा राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आनंदाचा दिवस असणार आहे. या आनंदोत्सवात राज्यातील सर्व बैलगाडा मालक व बैलगाडा शौकिनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.

नाणोली तर्फे चाकण येथील दत्त जयंती उत्सव समिती तसेच मोनिका शिंदे व सुधाकर शेळके यांनी गावामधील दत्त जयंती यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता. बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी असल्याने गेल्या 7-8 वर्षांपासून या यात्रोत्सवात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करता आले नव्हते.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून महाराष्ट्र प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडी शर्यतीचे आयोजन) नियम 2017 मध्ये विहित करण्यात आलेल्या नियम व अटी व शतीचे पालन करुन बैलगाडा शर्यतीस परवानगी देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, शिरूर लोकसभा खासदार अमोल कोल्हेसह तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.