PCMC : आयुक्तांनी चऱ्होली, बोऱ्हाडेवाडीतील प्रकल्पाची केली पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील (PCMC) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘कालबद्ध कार्यक्रम’ हाती घेतला असून, त्याआधारे कामाला गती देण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ‘ऑनफिल्ड’ पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Gold Rates – आजचे सोने-चांदी भाव

महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ‘प्रधानमंत्री आवास योजना’ अंतर्गत चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी येथे सुरू असलेल्या प्रकल्पांतील लाभार्थींना सदनिकांचे वाटप झालेले नाही. या पार्श्वभूमीवर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची महापालिका भवनात बैठक घेतली होती.

त्यावेळी इमारतींचे काम पूर्ण झालेल्या सदनिकांचा ताबा देण्याबाबत तारखाही जाहीर केल्या होत्या. नियोजनाप्रमाणे कामाची पाहणी करण्याबाबत आयुक्त स्वत: दौरा करतील, असे निश्चित केले होते. त्यानुसार, मंगळवारी महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह शहर अभियंता रामदास तांबे, सहायक आयुक्त अण्णा बोदाडे उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले की, लाभार्थींना सोबत घेवून आयुक्तांनी प्रत्यक्ष सदनिकांची पाहणी केली. लाभार्थींना ‘टाईमलाईन’मध्ये सदनिकांचा ताबा देण्यात येणार आहे. ताबा दिल्यानंतर सोसायटी स्थापन करुन हस्तांतरण करण्यात येईल. त्यानंतर सदनिकाधारकांनी सोसायटीच्या पायाभूत सोयी-सुविधांबाबत सक्षमपणे निर्णय घ्यायचे आहेत, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी लाभार्थींना दिल्या आहेत.

… असा मिळणार सदनिकांचा ताबा

बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील लाभार्थींना 31 जुलै 2023 रोजी काम पूर्ण करुन घरे ताब्यात देण्यात येणार आहेत. चऱ्होली प्रकल्पातील 4 इमारतीचे काम लवकर पूर्ण करून दि. 31 ऑगस्ट 2023 रोजी काम पूर्ण करुन लाभार्थ्यांना घरे ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच, इमारत क्रमांक 2 आणि 3 दि. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत काम पूर्ण करुन ताबा देणे. इमारत क्रमांक 4 इमारतीचा 31डिसेंबर 2023 रोजी ताबा देण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने प्रशासनाने कार्यवाहीला गती दिली आहे.

गेल्या आठवड्यात महापालिका भवनात झालेल्या बैठकीनुसार, लाभार्थींना निर्धारित वेळेत सदनिकांचा ताबा मिळावा. या करिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार निर्धारित तारखेला संबंधित लाभार्थींना सदनिकांचा ताबा मिळावा, अशी अपेक्षा आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाने याकामी सकारात्मक भूमिकेतून कार्यवाही सुरू केली आहे. यातून ‘प्रधानमंत्री आवास’च्या लाभार्थींना निश्चितपणे दिलासा मिळेल असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.