Ind vs SA: भारतीय संघाचा दक्षिण अफ्रिकेवर ऐतिहासिक विजय

एमपीसी न्यूज : (विवेक दिगंबरराव कुलकर्णी): 
ऐतिहासिक विजयासह भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला तब्बल 113 धावांनी हरवून आज (गुरुवारी) ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच बरोबर मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

शेवटच्या दिवशी असलेली पावसाची भीती,यजमान संघासाठी असलेले घरचे पोषक वातावरण यातले एकही संकट भारतीय संघाच्या विजयी रथाला रोखू शकली नाहीत आणि उपहारानंतर अवघ्या काहीच क्षणात भारतीय संघाने यजमान आफ्रिका संघाला 113 धावांनी हरवत मोठा विजय मिळवत मालिकेत 1 विरुद्ध शुन्य अशी आघाडी मिळवत आफ्रिका मिशनची सुरुवात यशस्वी आणि शानदार केली आहे.

युवा शिलेदार आणि अनुभवी लिजेंड यांच्या पाठीशी साक्षात द वॉल म्हणून ओळखले जाणारे गुरू राहुल द्रविड यांच्याही नव्या डावाची सुरुवात शानदार झाली आहे.

भारतीय संघ या कसोटीवर चांगलीच पकड पहिल्या दिवसापासूनच मिळवली असल्याने विजय फार दूर नक्कीच नव्हता, पण अविश्वसनियता जीचा मुख्य स्थायीभाव आहे,त्या कसोटी क्रिकेटमध्ये आणि या खेळाच्या कुठल्याही फॉरमॅट मध्ये भाकीतच करु नये असे म्हणतात, त्यामुळे निकाल लागेपर्यंत काहीही खात्रीपूर्वक सांगता येत नव्हते, जरीही विजय हाकेच्या अंतरावर दिसत होता,तरी आज कदाचित पाऊस येईल अशी शक्यता हवामानखात्याने वर्तवली असल्याने मनात काहीशी धाकधूक होतीच,पण त्या सर्व आशंकाना आज भारतीय विक्रमी कामगिरीने दूर लोटत एक मोठा आणि हवाहवासा विजय मिळवून देत क्रिकेटवेड्या भारतीय रसिकांना नवीन वर्षाची एक अविस्मरणीय भेट दिली आहे.

आजचा खेळ सुरू झाल्यावर आफ्रिकेच्या कालच्या धावसंख्येत केवळ 20 धावांची भर पडते न पडते तोच बुमराहने केशव महाराजला एका खतरनाक यॉर्करवर त्रिफळाचित करून आजच्या दिवसातले पहीले यश मिळवून दिले,या आनंदाला द्विगुणित केले ते त्यानेच.जम बसलेल्या आणि आतापर्यंत सर्वांगसुंदर खेळ करणाऱ्या डीन एलगरला वैयक्तिक 77 धावा करून,या विकेटने भारतीय संघ विजयाच्या आणखीनच जवळ आला आणि कच खाल्लेल्या यजमानांना या विकेटने फार मोठा धक्का बसला,त्यामुळे भारतीय गोलंदाज अधिकच त्वेषाने गोलंदाजी करू लागले.

तरीही बाऊमा आणि यंसेनने बऱ्यापैकी झुंज देत भारतीय संघाला बहुप्रतिक्षित विजयाची वाट काही वेळ का होईना पण रोखून धरली, पण..हे फार काळ चालणार नव्हतेच, उपहारानंतर थोडयाच वेळात आर अश्विनने यजमानांचे शेपूट अजिबातही वळवळणार नाही याची खबरदारी घेत अखेरच्या दोन विकेटस मिळवून भारतीय संघाला एक मोठा आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला. होय, या सेंच्युरियन मैदानावर विजय मिळवणारी पहिली आशियाई टीम असा विक्रमाच्या पुस्तकात सोनेरी अक्षराने नोंद करणारा हा विजय म्हणूनच ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ही आहे. दक्षिण आफ्रिका संघासाठी एकच बाब लक्षणीय राहिली ती म्हणजे त्यांच्या उर्वरित फलंदाजांनी हाराकरी न करता आपल्या विकेट्स फेकल्या नाहीत. यातून योग्य तो धडा भारतीय संघातल्या तथाकथित नामांकित फलंदाजांनी घेतलाच पाहिजे.

भारताकडून दुसऱ्या डावात बुमराह आणि शमीने प्रत्येकी तीन तीन तर सिराज आणि अश्विनने दोन दोन बळी घेतले. पहिल्या डावात अप्रतिम शतक करणाऱ्या लोकेश राहुलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

या मालिकेतला दुसरा सामना आता नवीन वर्षात होणार आहे. म्हणजेच येत्या 3 जानेवारी रोजी तो जोहान्सबर्ग येथे होणार आहे. त्यातच विजय मिळवून भारतीय संघाने मालिका आपल्या खिशात घालावी अशी अपेक्षा कोहली आणि द्रविड सह तमाम भारतीय रसिकांची असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.