Pimpri : महापौर, सभागृहनेत्याचे डावपेच स्वपक्षीय नगरसेविकेनेच उघडे पाडले!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांमधील बेबनाव पुन्हा एखदा चव्हाट्यावर आला आहे. सौरउर्जेतून विजनिर्मितीचा विषय तहकूब करण्याचा पक्षादेश (व्हिप)सभागृहनेत्याने भाजपच्या नगरसेवकांना बजाविला. तथापि, महापौर, सभागृह नेत्याने आयत्यावेळी तो विषय मंजूर करण्याची खेळी केली. ही खेळी भाजपच्याच नगरसेविका सीमा सावळे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला. तसेच ‘व्हीप’चे उल्लंघन कशाला करता असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांना वेड्यात काढून विषय मंजूर करणार असाल तर त्याला आपला विरोध असेल, असेही त्या म्हणाल्या. 

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयात आणि निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात सौरउर्जेतून वीज निर्मितीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वायसीएम आणि जलशुद्धीकरण केंद्रातील इमारतींचे छत, टाकी पुढील 25 वर्ष वापराकरिता क्लीन मॅक्स संस्थेला देण्यास पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीने मान्यता दिली आहे. निर्माण होणारी वीज तीन रुपये 62 पैसे प्रती युनिट या दराने महापालिका 25 वर्षाकरिता घेणार आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सप्टेंबर महिन्याच्या सभेच्या विषयपत्रिकेवर तीस-या क्रमांकावर हा विषय मान्यतेसाठी ठेवला होता.

सत्ताधारी भाजपने पार्टी मिटिंगमध्ये हा विषय तहकूब ठेवण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार सभागृह नेते एकनाथ पवार यांनी हा विषय तहकूब करण्याचा ‘व्हीप’ पक्षाच्या नगरसेवकांना बजाविला. तथापि, महासभेत महापौर आणि सभागृह नेत्याने आयत्यावेळी व्हीप डावलत हा विषय मंजूर करण्याचा निर्णय घेतला. महापौर, पक्षनेत्याची खेळी लक्षात येताच भाजपच्याच नगरसेविका सावळे यांनी त्याला आक्षेप घेतला. हा विषय तहकूब करण्याचा व्हीप नगरसेवकांना दिला असताना आयत्यावेळी मंजुरीचा घाट का घातला जातोय, असे त्या म्हणाल्या.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, हा विषय तहकूब करण्याचा व्हीप होता. परंतु, आयत्यावेळी तो विषय मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर आणि सभागृह नेत्याला थोडा तरी अधिकार आहे की नाही. त्यामुळे हा  विषय मंजूर करण्यात यावा.  त्यावर पुन्हा सावळे बोलण्यासाठी उभा राहिल्या. त्या म्हणाल्या, दबावतंत्राचा वापर करत विषय मंजूर करु नका.  नगरसेवकांना वेड्यात काढून विषय मंजूर कसा करता?, केवळ महापौर आणि सभागृह नेत्यालाच अधिकार नाही. नगरसेवकांना देखील विषय समजून घ्यायचा अधिकार आहे. या विषयाची रेटिंग सिस्टीम सर्व नगरसेवकांना कळली पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी विषय मंजूर करण्यास विरोध दर्शविला.

त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खुलासा केला. शहराचा स्मार्ट सिटीत तीस-या टप्यात समावेश झाला आहे. वेळ कमी असल्याने सभागृहाने या विषयाला मंजूरी द्यावी. त्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी हा विषय मंजूर केला. दरम्यान, यावरुन सत्ताधा-यांमधील बेबनाव पुन्हा एखदा चव्हाट्यावर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.