Nigdi : घातपातातून बांधकाम साईटवर काम करणा-या मजुराचा खून; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर काम करणा-या मजुराचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 10) रात्री पाटील नगर, दगडी खदाण, चिखली येथे घडली. एका 25 वर्षीय महिलेने शरीरसुखासाठी निर्जन स्थळी बोलावून तिच्या प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

धन पठाणी कामी (वय 42, रा. विश्वकल्याणी स्कूल, सोनावणे वस्ती, चिखली), खेमराज राणा कामी (वय 25, रा. प्रभू प्रोलेक्स प्राईड, शिंदे वस्ती, रावेत) आणि पूजा रामसिंग ढकालवर (वय 25, रा. आंबेडकर भवन मागे, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विजय प्रल्हाद सोळंकी (वय 40, रा. भांगरे कॉलनी, चिखली) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि पूजा या दोघांचे अनैतिक संबंध होते. तर पूजाचे धन कामी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास पूजाने विजयला शरीरसुखासाठी शेलारवस्ती, पाटील नगर येथील दगडी खदान येथील निर्जन स्थळी बोलावले. विजय घटनास्थळी आले असता तिथेच पूर्वीपासून दबा धरून बसलेले धन आणि त्याचा चुलत भाऊ खेमराज यांनी विजय यांचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळला. त्यांच्या डोक्यात दगड मारून त्यांचा खून केला आणि त्यांचा मृतदेह दगडी खदानीमध्ये टाकला.

सुरुवातीला याप्रकरणी मनुष्य मिसिंगची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर विजय यांचा मृतदेह शुक्रवारी खदानीमध्ये आढळून आला. याबाबत तपास करत असताना विजय यांचे पूजा सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पूजाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक रघुनाथ भोये तपास करीत आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उप आयुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एन. सोनवणे, पोलीस उप निरीक्षक रघुनाथ भोये, कर्मचारी ना. पा. जाधव, संदीप पाटील, स्वामीनाथ जाधव, किशोर पढेर, किरण खेडकर, चेतन मुंढे, विलास केकाण, फारुख मुल्ला, मछिंद्र घनवट, आनंद चव्हाण, मंगेश गायकवाड, राम साबळे, नितीन बहिरट, नाणेकर, जमीर तांबोळी, शरीफ मुलाणी, रमेश मावसकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल बिरादार, पोलीस मित्र बाळासाहेब जाधव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.