Green School – Zero West : स्वछाग्रह अभियानात ‘ग्रीन स्कूल- झिरो वेस्ट’ या नव्या योजनेचा समावेश योजना

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेने विविध आस्थापनांना कर सवलत देताना स्वछाग्रह अभियानात नागरी सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. ग्रीन स्कूल- झिरो वेस्ट (Green School – Zero West) या तत्वावर किमान पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे अशा शैक्षणिक संस्थांच्या इमारतीत कंपोस्टिंग यंत्रणा, झिरो वेस्ट संकल्पना, रेनवॉटर हार्वेस्टिंग व सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित असल्यास त्यांना सामान्य करात भरीव सवलत दिली जाणार आहे. फक्त महिलांच्या नावे असलेल्या फक्त एका निवासी मालमत्तेस 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

ऑनसाईट कम्पोस्टिंग यंत्रणा कार्यान्वित असल्यास ओला कचरा पूर्णतः जिरवणा-या शैक्षणिक संस्थांना देय सामान्य करात 4 टक्के सवलत दिली जाणार आहे.  ओला व सुका कचरा पूर्णतः जिरवणा-या आणि झिरो वेस्ट संकल्पना राबविण्या-या शैक्षणिक संस्थांना सामान्य करात 7 टक्के सूट दिली जाईल. झिरो वेस्ट आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यान्वित आहे अशा संस्थांना सामान्य करात 8 टक्के सवलत मिळेल. झिरो वेस्ट संकल्पनेसह सौरउर्जेचा प्रकल्प कार्यान्वित असल्यास त्या शैक्षणिक संस्थांना सामान्य करात 9 टक्के सवलत दिली जाईल. झिरो वेस्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि सौरउर्जा प्रकल्प कार्यान्वित असल्यास अशा शैक्षणिक संस्थांस सामान्य करात 10 टक्के सवलत देण्यात येईल.

महापालिकेने विविध कर सवलती (Green School – Zero West) दिल्या आहेत. त्यामध्ये महिलांच्या नावे असलेल्या मालमत्ता, आगाऊ कर भरणा करणारे, ऑनलाईन कर भरणा करणा-या आणि माझी मिळकत माझी आकारणी या योजनेत सहभाग घेणा-या व्यक्तींना वेगवेळ्या करांमध्ये सवलत दिली जात आहे. महापालिका महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी प्रागतिक दृष्टीकोन रुजविणे, सर्व क्षेत्रात समान संधी, साधनसामग्री उपलब्ध करून देऊन महिलांना अधिकाधिक करसवलतीच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करून घेतले जात आहे.

फक्त महिलांच्या नावे असलेल्या फक्त एका निवासी मालमत्तेस 50 टक्के सवलत

महापालिकेच्या “स्वच्छाग्रह” अभियानांतर्गत मनपा हद्दीतील मोठ्या गृहरचना संस्थांना करसवलत देण्यात येत आहे. त्यासोबत आता मध्यम व लहान गृहरचना संस्था, स्वतंत्र घरे, बंगले, हॉटेल, उपहारगृहे अशा आस्थापनांना ही करसवलत दिली जाणार आहे.  मालमत्ताधारकांना समन्यायी करसवलत देणे, सर्व घटकांना सामावून घेणे, पूर्वीच्या करसवलतीतील क्लिष्टता दूर करून सहज आणि सोप्या स्वरुपात नव्याने करसवलती देऊन समानता आणि सुलभता यावी हा यामागचा उद्देश आहे. फक्त महिलांच्या नावे असलेल्या फक्त एका निवासी मालमत्तेस देय सामान्यकर रकमेत सन 2022 – 23  करिता 50 टक्के, सन 2023 – 24  करिता 30 टक्के तर सन 2024 – 25 करिता 20 टक्के सवलत असणार आहे.  थकबाकीसह एकरकमी मिळकतकराचा भरणा आनलाईन पेमेंट गेटवेद्वारे करणाऱ्यास 5 टक्के सवलत असणार आहे.  “माझी मिळकत, माझी आकारणी” योजनेंतर्गत स्वयंस्फूर्तीने मालमत्तेची महापालिकेच्या संकेतस्थळावर अथवा स्वत: अर्ज करून मालमत्ताकर आकारणी नोंदणी करणाऱ्या मालमत्ताधारकांस फक्त पहिल्या वर्षाकरिता 5 टक्के सवलत पूर्वीप्रमाणे कायम (Green School – Zero West) ठेवण्यात आली आहे.

कम्पोस्टिंग यंत्रणा, एस.टी.पी.प्लांट तसेच झिरो वेस्ट संकल्पना राबविणाऱ्या इमारतींमधील निवासी मालमत्तांना करसवलत मिळणार आहे. ओला कचरा पूर्णत: जिरविणाऱ्या मालमत्तांना सामान्य कर दरात 5 टक्के, एस.टी.पी. कार्यान्वित असल्यास 3 टक्के, ऑनसाईट कंपोस्टिंग यंत्रणा आणि एस.टी.पी. कार्यान्वित असल्यास 8 टक्के, झिरो वेस्ट संकल्पना राबविण्यात येत असल्यास आणि ओला आणि सुका कचरा पूर्णत:जिरविण्यात येत असल्यास 8 टक्के तर झिरो वेस्ट, एसटीपी कार्यान्वित असल्यास तसेच ओला व सुका कचरा पूर्णतः जिरवणाऱ्या इमारतीमधील निवासी मालमत्तांना देय सामान्य करात 10 टक्के सवलत दिली जाणार आहे. आगाऊ मालमत्ता कर भरणा-या मालमत्ता धारकांनी संपूर्ण मिळकत कराची रक्कम आगाऊ भरल्यास त्यांना सन 2022-23 करिता 10 टक्के तर सन 2023-24  पासून पुढे 5 टक्के निवासी मालमत्तेसाठी तर ५ टक्के बिगर निवासी मालमत्तेसाठी सामान्य कर रकमेत सूट दिली जाईल. याबाबतची माहिती आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.