Thergaon News: बिर्ला हॉस्पिटलकडून रुग्णांची लूट, सखोल चौकशी करा, खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांकडून अवास्तव बिलांची आकारणी केली. शासकीय योजनांचा रुग्णांना लाभ दिला नाही. हॉस्पिटल प्रशासन नातेवाईकांना उद्धटपणे वागणूक देते. बिर्लामध्ये मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. या हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी येत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूंची, अवास्तव बिल वसुलीची सखोल चौकशी करुन उचित कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना निवेदन दिले आहे. खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात थेरगाव येथे ५०० बेडचे आदित्य बिर्ला मेमोरीयल हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांकडून वाढीव बिले आकारली जातात. त्याचबरोबर आगाऊ व पैसे वेळेवर भरले नाही तर रुग्णांचा उपचार तत्काळ थांबवला जातो. यामुळे रुग्ण दगावले जातात. विमा धारक रुग्णांकडून अवाजवी बील आकारणी केली जाते. कोरोना काळात रुग्णांना फसविण्याचे काम या हॉस्पिटलने केले.

नातेवाईकांबरोबर अरेरावीची भाषा वापरली जाते. हॉस्पिटमध्ये डॉक्टर, कर्मचा-यांची संख्या बेडच्या तुलनेने कमी आहे. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत. कोरोना काळात या हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक रुग्ण दगावले आहेत. या हॉस्पिटल विषयी अनेक तक्रारी आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने हॉस्पिटलची चौकशीही केली आहे. एखादा रुग्णाचा मृत्यू झाल्यास पूर्ण पैसे जमा केले जात नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात दिला जात नव्हता. अनेक दिवस हॉस्पिटलमध्येच मृतदेह ठेवला जातो. नियमानुसार 12 तासात मृतदेहावर अंत्यसंस्कार होणे आवश्यक आहे.

या हॉस्पिटलमध्ये सरकारी योजनांचाही लाभ रुग्णांना मिळत नाही. कमी उत्पन्न गटातील राखीव बेड रुग्णांना दिले जात नाहीत. याबाबत नातेवाईक सातत्याने तक्रारी करत आहेत. सरकारी कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी, सैनिक यांच्यासाठी राखीव बेड असताना दाखल करताना बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. तसेच त्यांना बाहेर ताटकळत ठेवले जाते. रुग्णांचे नातेवाईक काही विचारण्यास गेल्यावर त्यांना दम दिला जातो. पोलीस केस करण्याची धमकी दिली जाते;अथवा त्यांच्या अंगावर बाऊंसर सोडले जातात. अशा प्रकारची तुच्छ वागणूक रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना दिली जाते. पोलीसही जास्त लक्ष देत नाहीत. बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या नावाखाली रुग्णांना लुटण्याचे काम केले जात आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासनाकडे, इंडिएन मेडिकल असोसिएशनकडे तक्रार केली आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत होणारा गैरव्यवहार लक्षात घेता हॉस्पिलच्या प्रत्येक व्यहाराची चौकशी व्हावी. मागील दोन वर्षात हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूंची चौकशी करावी. आवाजवी बिल वसूल केल्याबाबत सखोल चौकशी करुन उचित कारवाई करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.