Pune News : यंदा फटाक्यांच्या आतिषबाजीने पुण्यातील या भागात सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाची नोंद 

एमपीसी न्यूज : गेल्यावर्षी कोरोनामुळे दिवाळीला फटाके फोडण्यावर काहीसे बंधने घालण्यात आली होती. यंदा मात्र काही प्रमाणात बंधनात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्साहामध्ये फटके फोडले. रहिवासी क्षेत्रात हे प्रमाण सरासरीपेक्षा तब्बल 20 ते 30 डेसीबलने अधिक नोंदवण्यात आले. त्यामुळे खडकी, सातारा रस्ता, तर रात्री लक्ष्मी रस्ता आणि कर्वे रस्ता येथे सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाची नोंद घेण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून दिवाळी उत्सवादरम्यान महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ध्वनी प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या जात आहेत. उत्सवापूर्वी, उत्सवादरम्यान आणि उत्सवानंतर अशा तीन टप्प्यांत ध्वनीची पातळी मोजली जाते. मंडळातर्फे यंदा पुण्यात 11 ठिकाणी तर पिंपरी-चिंचवड येथे 3 ठिकाणी अशा एकूण 14 ठिकाणी ध्वनी प्रदूषणाच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.

या नोंदीनुसार, पुण्यात यंदा उत्सवादरम्यान म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या रात्री ध्वनीची पातळी ही प्रमाण मर्यादेपेक्षा काही अंशी कमी असल्याचे आढळले, तर दिवसा ध्वनीची पातळी ही प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. दिवाळीत फटाक्‍यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी झाले असले,

तरी प्रमाण मर्यादेपेक्षा ही पातळी अधिक आहे. त्याचबरोबर दिवसा होणाऱ्या आवाजाचा मुख्य स्रोत हा फटाके नसल्याने, शहरात इतर स्रोतांमधून होणारे ध्वनी प्रदूषण हे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही या नोंदीमधून समोर आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवकाळात शहरांतील ध्वनी प्रदूषणाची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील 11, तर पिंपरी-चिंचवडमधील तीन ठिकाणांचा समावेश आहे. तीन टप्प्यांत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत उत्सवापूर्वीची नोंद 29 ऑक्‍टोबर रोजी घेण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.