Maval : मावळात उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी सर्व इच्छुक गुरुवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करून भरणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात कोणत्याही राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर झाले नसले तरी सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांनी गुरुवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा चंग बांधला आहे. भाजपातील प्रमुख दोन इच्छुक राज्यमंत्री बाळा भेगडे व सुनील शेळके यांनी प्रत्येकी 25 हजार नागरिकांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे मनसुबे सोशल मीडियावरुन जाहीर केले आहेत.

राष्ट्रवादीचे ग्रामीण नेतृत्व असलेले बाळासाहेब नेवाळे व भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे हे देखील मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपा व राष्ट्रवादीचे प्रमुख इच्छुक त्यांच्या हजारो समर्थकांसह वडगाव मावळ येथे शक्ती प्रदर्शन करणार असल्याने वडगावला सकाळपासूनच जत्रेचे व छावणीचे स्वरुप येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच खर्च निवडणूक खर्चात समाविष्ट होत असल्याने इच्छुकांच्या शक्ती प्रदर्शनाकडे निवडणूक आयोग कसे पाहतोय हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

कामगार व पर्यावरण राज्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या मावळ विधानसभा मतदार संघातच पक्षातील इच्छुकांच्या रस्सीखेचमुळे अद्यापपर्यंत कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. बंडखोरी टाळण्याकरिता भाजप पक्षश्रेष्ठींनी मावळात उमेदवारी जाहीर न करता थेट अे बी फाॅर्म देण्याचे ठरविले असल्याची चर्चा आहे. मात्र, हा अे बी फाॅर्म कोणाला मिळणार हे सस्पेंन्स आजही कायम आहे. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या समर्थकांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार व राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता गुरुवारी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वडगावला जमावे, असे पत्रक काढले आहे. दुसरीकडे सुनील शेळके यांनी देखील भाजपाचे कमळ हे चिन्ह वापरत आपल्या समर्थकांना वडगाव मावळ येथे जमण्याचे आवाहन केले आहे.

जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याकरिता मावळातील कानाकोपर्‍यातून वाहनांची सोय करण्यात आली आहे. हजारो वाहनांमध्ये नागरिकांना शक्ती प्रदर्शनात सहभागी करण्याकरिता आणण्यात येणार आहे. यामध्ये काही जण उत्स्फूर्तपणे तर काही जणांना भाड्याने आणले जाणार आहेत. माझ्या मागे किती जनसमुदाय आहे हे दाखविण्याकरिता हे शक्ती प्रदर्शन असणार आहे. वास्तविक विधानसभा निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. गुरुवारच्या शक्ती प्रदर्शनाचे बारकाईने निरीक्षण केल्यास उमेदवारांना ठरवून दिलेली खर्चाची मर्यादा एकाच दिवशी संपणार आहे. मात्र, निवडणूक आयोग या सर्व बाबींकडे कसे पाहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजप असो वा राष्ट्रवादी दोन्ही पक्षाने मावळची उमेदवारी जाहीर न करता सस्पेन्स कायम ठेवले आहे. असे असले तरी इच्छुक जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याने अधिकृत उमेदवारीची माळ कोणाचा गळ्यात पडणार तसेच बंडखोरी टाळण्याकरिता दोन्ही राजकीय पक्षांनी खेळलेली खेळी यशस्वी ठरणार की त्यांच्यावरच उलटणार हे येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. मात्र, या राजकीय डावपेचांमुळे मावळात कोण निवडून येणार यापेक्षा कोणाला उमेदवारी मिळणार याचीच जास्त चर्चा रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.