Pune News : कात्रज परिसरातील ‘त्या’ खून प्रकरणी माजी सरपंचासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजरवाडी भागात बुधवारी पहाटे मोहन चौडकर (वय 35) या तरुणाचा मृतदेह सापडला होता. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून तो खून झालेल्या व्यक्तीच्या मामीचा सख्खा भाऊ होता. तसेच तो हवेली तालुक्यातील पेंजर गावचा ग्रामपंचायतचा विद्यमान सदस्य आहे. त्याने यापूर्वी सरपंच पद देखील भूषवले आहे. 

विकास रमेश चव्हाण (वय 31) आणि सचिन जालिंदर डाकले (वय 29)  या दोघांना अटक केली आहे. तर मोहन चौंडकर (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मोहन यांची पत्नी पूजा यांनी तक्रार दिली असून याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत मोहन आणि आरोपी विकास हे दोघे नातेवाईक आहेत. विकास याची मामी ही मोहन याची सख्खी बहीण आहे. विकास हा पेंजर गावचा विद्यमान सदस्य आहे. तर काही वर्षे तो सरपंच देखील होता. विकास याने मयत मोहन याला मांगडेवाडी परिसरात जागा घेऊन दिली होती. याच जागेवर इतर काही सुविधा निर्माण करून देण्यावरून त्या दोघात वाद व्हायचे.

दरम्यान कात्रज परिसरातील याच भागात विकास यांच्या एका मित्राने जागा घेतली होती व त्याचे बांधकाम सुरू होते.  त्याची पाहणी करण्यासाठी विकास आणि त्याचा मित्र दोघेजण या ठिकाणी आले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळी ती तिथेच थांबले. याठिकाणी मयत मोहन हा देखील आला. यावेळी दारू पीत असताना त्यांच्यात पुन्हा जुन्या कारणावरून वाद झाले. याच रागातून आरोपीने मोहन याच्या दिशेने इटा भिरकावल्या. या दरम्यान तो खाली पडल्यानंतर पुन्हा त्याच्या डोक्यावर विटांनी मारहाण करत त्यांचा खून केला आणि आरोपी पसार झाले.

दरम्यान खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. गुन्हे शाखेचे पोलिसही या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. तपास सुरू असताना त्यांना यातील आरोपी साताऱ्याच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, अश्विनी केकान, अमर पवार यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.