Sangvi Crime News : गॅस स्फोट प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – व्यावसायिक गॅस सिलेंडर मधून लहान मोकळ्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस चोरी करत असताना झालेल्या स्फोटात दोघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 8) दुपारी एक वाजता जांबुळकर चाळ, नवी सांगवी येथे घडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप कुमार सुखराम बिष्णोई, बनवारीलाल बिष्णोई (दोघे रा. जांबुळकर चाळ, नवी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार विशाल चौधरी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवी येथे एका घरात आरोपी दिलीप आणि बनवारीलाल हे दोघेजण मोठ्या व्यावसायिक गॅस सिलेंडर मधून लहान रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे, धोकादायकरित्या गॅस काढून त्याची चोरी करत होते. गॅस काढताना झालेल्या हलगर्जीपणामुळे गॅसच्या व्हेपरला आग लागली आणि भडका उडाला. या भडक्यामुळे घराच्या भिंती पडल्या आणि आरोपी दोघेजण जखमी झाले.

आरोपींनी अवैधरित्या गॅस चोरी केली तसेच त्यासाठी कोणतीही खबरदारी घेतली नाही. यामुळे आजूबाजूला राहणा-या लोकांच्या तसेच स्वतःच्या जीवाला आरोपींनी धोका निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.