Prakash Telang Passed Away : टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग यांचे निधन

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग (74) यांचे बुधवारी (दि.08) निधन झाले. तेलंग यांनी तब्बल तीन दशके टाटा मोटर्समध्ये काम केले. 2012 मध्ये ते निवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाने कर्मचारी शोकाकुल झाले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली असा परिवार आहे

प्रकाश तेलंग यांनी 1967 साली व्हीएनआयटी, नागपूर येथून यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 1972 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद मधून त्यांनी पदव्युत्तर पदविका पूर्ण केली. सुरवातीला तीन वर्षे त्यांनी लार्सन आणि टुब्रोमध्ये काम केले. टाटा अॅडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस (TAS) मार्फत त्यांनी टाटा मोटर्स पिंपरी येथील ग्रोथ विभागात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली.

टाटा मोटर्सच्या लोकप्रिय ठरलेल्या 407 या टेम्पोच्या संशोधन आणि निर्मितीत तेलंग यांचा मोलाचा वाटा होता. 2005 मधील छोटा हत्ती (TATA ACE) या बहुउपयोगी वाहनाच्या निर्मिती आणि यशात त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. मनमिळावू स्वभाव आणि प्रेरणादायी संभाषणामुळे ते कामगारांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. कुशल नेतृत्व म्हणून त्यांनी तीन दशके सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. 2007 मध्ये त्यांनी टाटा मोटर्स संचालक मंडळात कार्यकारी संचालक म्हणून प्रवेश केला. 2009 साली त्यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. टाटा उद्योग समुहातील अवजड आणि व्यापारी वाहन उत्पादन व्यवस्थापन, संशोधन क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.