Chinchwad News : प्रकाश तेलंग या पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली – डॉ. नरेंद्र वैद्य

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश तेलंग (74) यांचे बुधवारी (दि.08) निधन झाले. पितृतुल्य व्यक्तीमत्व हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात लोकमान्य हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र वैद्य यांनी प्रकाश तेलंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रकाश तेलंग हे लोकमान्य हॉस्पिटलचे संचालक म्हणूनही काम पाहत होते. तेलंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना लोकमान्य हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र वैद्य म्हणाले, ‘तेलंग यांच्या निधनाने लोकमान्य हॉस्पिटल परिवाराची मोठी हानी झाली आहे. टाटासह ते अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळात कार्यरत होते. हॉस्पिटलच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तेलंग त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे नेहमीच मार्गदर्शन करत तसेच, विषय पुढे नेण्याच्या दृष्टीने उपाय योजना सुचवत. पितृतुल्य व्यक्तीमत्व हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, त्यांच्या कुटूंबियांना हा आघात सहन शक्ती शक्ती देवो.’

तेलंग यांनी तब्बल तीन दशके टाटा मोटर्समध्ये काम केले. 2007 मध्ये त्यांनी टाटा मोटर्स संचालक मंडळात कार्यकारी संचालक म्हणून प्रवेश केला. 2009 साली त्यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. 2012 मध्ये ते निवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाने कर्मचारी शोकाकुल झाले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.