Alandi : विदेश यात्रा करण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची टुरिस्ट कंपनीकडून दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – विदेशी यात्रेसाठी विमान तिकीट आणि हॉटेलचे बुकिंग करण्याच्या बहाण्याने एका टुरिस्ट कंपनीने दाम्पत्याकडून दोन लाख 14 हजार रुपये घेतले. त्यांचे तिकीट आणि हॉटेलचे बुकिंग न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत टुरिस्ट कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एप्रिल-मे 2019 या कालावधीत धानोरे तालुका खेड येथे घडली.

भालचंद्र सुरेश भोसले (वय 35, रा. धानोरे, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार द ट्रॅव्हल्स गो या टूरिस्ट कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 एप्रिल ते 1 मे या कालावधीत द ट्रॅव्हल्स गो या टुरिस्ट कंपनीच्या प्रतिनिधींनी भालचंद्र भोसले यांच्याशी संपर्क केला. त्यांना मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्याचे विमान तिकीट आणि हॉटेल बुकिंग करून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख 14 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन कंपनीने भोसले यांचे कोणत्याही प्रकारचे तिकीट अथवा हॉटेल बुकिंग केले नाही. याबाबत भालचंद्र भोसले यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.