Chakan : उपहारगृहातील कामगाराचा दोन अधिकाऱ्यांवर हल्ला

पुरुष अधिकारी अत्यवस्थ; महिलेचा हात मोडला

एमपीसी न्यूज – कंपनीतील उपहारगृहात काम करणाऱ्या कामगाराने कंपनीच्या कार्यालयात शिरून दोघा अधिकाऱ्यांवर लोखंडी रॉडने  खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना चाकण एमआयडीसी  मधील सावरदरी ( ता. खेड) हद्दीतील हायकोट कंपनीत शनिवारी (दि.१०) सायंकाळी घडली. लोखंडी रॉडने हल्ला झालेल्या या पुरुष अधिकार्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली असून बेशुद्धावस्थेतच त्यांची रवानगी पुण्यातील खाजगी रुग्णालयात करण्यात आली असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. याच हल्ल्यात जखमी झालेल्या महिला अधिकाऱ्यांचा हात मोडला आहे.

रोशनी प्रकाश खुडे ( वय २५, रा. शास्त्री चौक, राजगुरुनगर, ता. खेड) व पंकज बाळासाहेब शिंदे ( वय २६, रा. मोशी, ता. हवेली, पुणे) अशी या घटनेत जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. या बाबत रोशनी खुडे यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार राजू प्रभाकर नायर ( रा. राजगुरुनगर, सिद्धेश्वर चौक, ता. खेड, जि. पुणे) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी खुडे संबंधित कंपनीत मनुष्यबळ विकास विभागात ( एचआर ) अधिकारी असून पंकज शिंदे पर्चेस विभागाचे व्यवस्थापक आहेत.  हायकोट कंपनीच्या उपहारगृहात काम करणाऱ्या नायर याने कंपनीच्या कार्यालयात प्रवेश करून हातात आणलेल्या लोखंडी रॉडने शिंदे यांच्यावर हल्ला चढविला. यात शिंदे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. हा प्रकार सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या फिर्यादी खुडे यांच्याही हातावर व पायावर लोखंडी रॉडने हल्लेखोर नायर याने मारहाण केली. मोठा रक्तस्राव झाल्याने जागेवरच बेशुद्ध झालेल्या शिंदे यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर फिर्यादी खुडे यांचा या मारहाणीत हात मोडला आहे. घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह इतरांनी भेट दिली आहे.  कंपनीतील घटनास्थळावरून एक मोठा लोखंडी रॉड हस्तगत करण्यात आला आहे. अचानक संबंधित कामगाराने हल्ला का केला याचे काहीही कारण स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.