University Of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानांकनात आणखी भर घालणार

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जागतिक पातळीवर स्वतःची स्वतंत्र ओळख असणारे विद्यापीठ असून पुढील काळात मला जेवढा काळ या विद्यापीठात सेवा करण्याची संधी मिळेल त्यात मी या विद्यापीठाच्या मानांकनात आणखी भर घालण्याचा प्रयत्न करेन, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू व  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी व्यक्त केले. विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी कुलगुरू पदाची सूत्र डॉ. काळे यांच्याकडे सोपवत त्यांना शुभेच्छा दिल्या. 

 

यावेळी डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे,  प्रसेनजीत फडणवीस यांच्यासह अनेक व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

डॉ. काळे म्हणाले,  सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण सुरळीत करणे हे दोन मुख्य विषय मी प्राध्यान्यक्रमावर ठेवले आहेत. अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत लवकरच याबाबत धोरण ठरवले जाईल.

 

प्रभारी पदभार स्विकारल्यानंतर आपण विद्यापीठाला कसा वेळ देणार यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. काळे म्हणाले, मी पारंपरिक पद्धत न वापरता कामाच्या गरजेनुसार कुठे किती वेळ द्यायचा हे ठरवेल.

 

येत्या काळात दोन्ही विद्यापीठातील चांगल्या गोष्टी कोणत्या प्रकारे एकमेकांना घेता येतील यासाठी प्रयत्न करू. सामंजस्य कराराच्या माध्यमातून लवकरच या दोन्ही विद्यापीठातील संबंधही अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही डॉ. काळे यांनी सांगितले.

 

विद्यापीठाने आणखी उंची गाठावी..!! – डॉ. नितीन करमळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माझ्या कार्यकाळात मी पठडी सोडून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही या विद्यापीठाची अशीच प्रगती होवो जी विद्यापीठाला आणखी उंचीवर नेऊन ठेवेन ही सदिच्छा..!! असे म्हणत डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाला निरोप दिला. विद्यापीठाशी असणाऱ्या चाळीस वर्षाचे ऋणानुबंधामुळे डॉ. करमळकर यांच्यासह त्यांचे सहकारी व कर्मचारी भावुक झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.