Chinchwad News : दुचाकी चोरणारा आणि विकत घेणारा पोलिसांच्या जाळ्यात; नऊ दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – दुचाकी चोरणाऱ्या आणि त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी विकत घेणाऱ्या अशा दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने अटक केली. अटक केलेल्या दोघांकडून नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

रामलिंग विश्वनाथ दांडगे (वय 19, रा. शिंदे वस्ती, वाल्हेकरवाडी, मूळ रा. बिदर, कर्नाटक) आणि रमेश हनुमंत राठोड (वय 20, रा. वाल्हेकरवाडी, मूळ रा. कुस्टगी, कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलिंग दांडगे हा देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी वाल्हेकरवाडी येथे येणार असल्याची माहिती शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. 16) सापळा रचून रामलिंग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पिंपरी-चिंचवड शहरातून 12 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपी रमेश राठोड याने चोरीची दुचाकी विकत घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार शस्त्र विरोधी पथकाने रमेश राठोड याला अटक केली. तसेच इतर चार दुचाकी जुबेर खान याला विक्री केल्या असून त्या दुचाकी तो मालेगाव येथे विक्रीसाठी घेऊन गेला असल्याचे तपासात समोर आले. दोघांकडून पोलिसांनी चोरीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.