Vaccination News: शहरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे सोमवारपासून लसीकरण; 1 लाख 16 हजार मुले लसीकरणासाठी पात्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 15 ते 18 या वयोगटांतील मुले व मुलींना येत्या सोमवार (दि.3) पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. या वयोगटातील 1 लाख 16 हजार 700 मुले-मुली शहरात आहेत. या पात्र लाभार्थ्यांनी 1 जानेवारी 2022 पासून कोविन पोर्टलवर नाव नोंदणी करावी असे आवाहन, महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार 15 ते 18 या वयोगटासाठी महापालिका लसीकरण मोहिम हाती घेत आहे. जन्माचे वर्ष 2007 व त्या पूर्वीचे असलेले सर्व मुले व मुली डोस घेऊ शकतात. त्यासाठी शनिवार (दि. 1) पासून कोविड पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.

लाभार्थी स्वतः नोंदणी करू शकतात किंवा नोंदणीसाठी कोविड पोर्टलवर असलेल्या खात्याद्वारे ऑनलाइन पद्धतीने किंवा युनिक मोबाईल क्रमांकाद्वारे नवीन खाते तयार करून देखील नोंदणी करू शकतात. ही सुविधा सध्या सर्व पात्र लाभार्थ्यासाठी उपलब्ध आहे. तसेच 3 जानेवारी पासून लसीकरण केंद्रांवर जाऊन ऑन साईट पध्दतीने लसीकरण कर्मचाऱ्यांकडेही नोंदणी करू शकतात. या लसीकरणासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तयारी सुरू केली असल्याचे डॉ. गोफणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.