Vadgaon : कोरोना; २६ एप्रिलला होणारा सामुदायिक विवाह सोहळा रद्द :हभप नंदकुमार भसे

एमपीसी न्यूज : मावळ प्रबोधिनी व मावळ तालुका वारकरी सांप्रदायिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ एप्रिल रोजी संपन्न होणारा सामुदायिक विवाह सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवी शेटे व मावळ तालुका वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप नंदकुमार भसे यांनी दिली.

देशात नव्हेतर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान मांडले आहे. त्यामुळे आपल्या देशात आणीबाणी जाहीर झाली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी प्रशासनाच्या सुचनेनुसार सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या पदाधिका-यांनी बैठक घेतली. या वेळी विचार विनमय करून २६ एप्रिल रोजी संपन्न होणारा सामुदायिक विवाह सोहळा रद्द करण्याची घोषणा केली.

यंदाच्या विवाह सोहळ्यात एक्कावन्न जोडप्यांची विवाहासाठी नोंदणी झाली होती. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा रद्द करण्यात आला.

सर्वांनी घरीच राहुन कोरोनाशी लढत द्यावी आणि कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी हातभार लावावा. घरी रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.