Vadgaon : चक्रीवादळात उद्धवस्त झालेली कातकरी बांधवांची घरे, झोपड्या पूर्ववत करण्यास ‘वीर बजरंगी’ सरसावले

'Veer Bajrangi' moves to restore houses, huts of Katkari brothers destroyed in cyclone

एमपीसीन्यूज – निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील वनक्षेत्रात फणसराई, वनाटी, उदेवाडी व राजमाची या अतीदुर्गम भागातील वन निवासी ठाकर, कातकरी बांधवांच्या घरांची झोपड्यांची गोठयांची प्रचंड हानी झाली होती. घरातील भांडी, कपडे आणि अन्नधान्याचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटात या आदिवासींना मदत करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते कर्तव्यबुद्धीने पुढे आले. चिंचवड येथील इस्कॉन कृष्णभक्त मंडळानेही या कार्यात पुढाकार घेतला आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या दुसऱ्याचा दिवशीच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परिसरात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व आदिवासी ठाकर, कातकरी बांधवांना धीर दिला.

लगोलग वनाटी व फणसराई येथील सर्व कुटुंबांस आवश्यक शिधा संच पुरविण्यात आले.

दि ५ जुन ते ९ जुन असे सलग ५ दिवस कार्यकर्त्यांनी पीडित बांधवांची पडलेली, विस्कटलेली घरे बांधून देण्यासाठी सुमारे ३५ मोठ्या ताडपत्र्या, मुबलक प्रमाणात दोर, तार असे नवीन साहित्य दानशूर व्यक्ती व संस्थांच्या सहकार्यातून उभे केले. श्रमदान करून घरे, झोपड्या पुन्हा निवासायोग्य करून दिल्या.

प्रत्येक कुटुंबास दोन ब्लँकेटस, माता भगिनींस साड्या, लहान मुलांना नवे कपडे, खाऊ, पुरुष मंडळींना कपडे पुरवून परिसरात औषध फवारणी करून स्वच्छता करण्यात आली. आदिवासी वाड्यांवर वृक्षारोपणही करण्यात आले.

आगामी काळात लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन यांच्यायांच्याकडे पाठपुरावा करून बाधित घरे व परिवारांचे योग्य पुनर्वसन व्हावे, त्यांची निवासी घरे शासकीय नोंदीने नियमित व्हावीत, यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सर्व स्थानिक कार्यकर्ते सर्वंकष प्रयत्न करण्याचे आश्वासनाही आदिवासी ठाकर, कातकरी बांधवांना देण्यात आले.

कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करित योग्य ती काळजी घेऊन वीर बजरंगीनी हे मदत कार्य केले गेले. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी हे मदत हे मदत कार्य केले.

या वेळी बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र संयोजक लहुकुमार धोत्रे, अशोक येलमार, धनाजी शिंदे, संदेश भेगडे, मुकुंद चव्हाण, कुणाल साठे, अमित भेगडे, नाना सावंत, संभाजी बालघरे, अभिजीत शिंदे, बाळासाहेब खांडभोर आदि कार्यकर्त्यांनी श्रमदानात भाग घेतला.

तर पाहणी, माहिती संकलन व शिधा वितरण कार्य प्रवीण देशमुख, अजय शेलार, शुभम कुल, गणेश निसाळ, अक्षय भेगडे, विनायक भेगडे व श्रीनिवास कुंडल यांनी पार पाडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.