Pimpri News : अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी विविध कार्यक्रम

 भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांची माहिती

एमपीसी न्यूज – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी 25 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या 7 वर्षांतील कामगिरीची माहिती देणारी व्याख्याने , ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, ई श्रम कार्ड वितरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत अटलजींच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, ‘अटलजी ते मोदीजी – सुशासनाचा प्रयास’ या विषयावर विविध क्षेत्रातील नामवंतांची व्याख्याने होणार आहेत. तसेच वकील , डॉक्टर , चार्टर्ड अकाऊंटंट , प्राध्यापक , उद्योजक अशा मंडळींचे मेळावे आयोजित करून मोदी सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय, सुशासन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी टाकलेली पावले याची माहिती दिली जाणार आहे.

गेल्या 7 वर्षांत मोदी सरकारने शेतकरी व अन्य समाजघटकांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारी पत्रके बूथ स्तरापर्यंत वितरीत केली जाणार आहेत.

या खेरीज सर्व बुथवर अटलजींच्या प्रतिमेला अभिवादन, जनसंघापासून काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान, अटलजींच्या कवितांचे जाहीर वाचन , महाविद्यालय परिसरात अटलजींच्या जीवनावर निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. महापालिका, नगरपालिका , जिल्हा परिषद , पंचायत समित्यांमध्ये सुशासनाची कल्पना राबविण्यासाठी उपक्रम राबविणाऱ्या भाजपा लोकप्रतिनिधींचा ‘ अटल पुरस्कार ‘ देऊन गौरव केला जाणार आहे.

असंघटीत कामगारांसाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या ई श्रम कार्ड योजनेची माहिती देऊन संबंधितांना ई श्रम कार्ड चे वितरण करणे आदी कार्यक्रमही होणार आहेत , असेही आमदार लांडगे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.