Pune News – एमसीए आयोजित स्पर्धेत व्हेरॉक विजयी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय 19 वर्षाखालील मुलांच्या निमंत्रित स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीने केडन्स संघाला धूळ चारत विजेतेपद पटकावले. ह्या स्पर्धेमध्ये व्हेरॉक संघाने एकही सामना न गमावता निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. प्रत्येक सामन्यागणिक आपल्या संघाचा खेळ सातत्याने बहरत गेला.
स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सर्व खेळाडूंना एक मीटिंग आयोजित करून आत्मविश्वास निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून राहुलसर, मोहन आणि पवन शहा ह्यांनी प्रत्येक खेळाडूचा काय रोल असावा, संघाचा विजय किती महत्वाचा आहे प्रत्येक सामन्यांपूर्वीची पूर्वतयारी आणि माजी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी अभिप्रेत असलेली कष्ट, जिद्द, शिस्त ह्या त्रिसूत्रीने वाटचाल करून यश मिळविण्यास उद्युक्त करण्यात आले आणि त्यांच्यासमोर मिशन चॅम्पियनशिपचे आव्हान ठेवण्यात आले. व्हेरॉकच्या खेळाडूंनी इतिहास रचला आणि केडन्स अकॅडमीची मक्तेदारी संपुष्टात आणली.
व्हेरॉककडून ओमकार राजपूत ( 77 धावा) आणि वैभव अगम (38 धावा) यांनी फलंदाजीमध्ये उत्कृष्ट योगदान दिले. सोहम जमाले ( 3 बळी) आणि ओम भाबड (3 बळी) यांनी सर्वोत्तम गोलंदाजी केली. ड्रॉ झालेल्या सामन्यात पहिल्या पारीच्या वर्चस्वामुळे व्हेरॉकने या सामन्यात दमदार विजय मिळवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.