Vijay More : दिव्यांग तरुणाचा मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी लातूर – मुंबई सायकल प्रवास

एमपीसी न्यूज – कोणी जन्माला येतानाच दिव्यांग आहेत, तर कोणी विविध घटनांतून जन्माला आल्यानंतर दिव्यांग होतो. दिव्यांग बंधू – भगिनींच्या अनेक समस्या आहेत, याकडे राज्यकर्त्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले आहे असे दिसून येत आहे. दिव्यांगांना त्यांचे आयुष्य चांगले जगता यावे यासाठी दिव्यांगांच्या (Vijay More) प्रमुख मागण्यांकडे मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यासाठी एका पायाने दिव्यांग असलेला लातूरचा एक तरुण चक्क लातूर ते मुंबई सायकलवर प्रवास करून मुख्यमंत्र्याची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार आहे. या युवकांने आपला प्रवास मंगळवारी लातूरातून सुरू केला असून तो हडपसर पुणे याठिकाणी आल्यावर मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि सुरक्षा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लातूर येथील विजय मोरे (Vijay More) असे या दिव्यांग तरुणाचे नाव आहे. 2012 साली रेल्वे अपघातात या युवकाला आपला उजवा पाय गमवावा लागला. त्यानंतर त्याने स्वतःला कृत्रिम पाय बसून आपला जीवन प्रवास सुरू ठेवला. मात्र, कृत्रिम पाय असल्याने जीवन जगत असताना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे. पर्याय उपलब्ध नसल्याने हा त्रास सहन करावा लागतो आहे. शासनाने दिव्यांगांना इतरांप्रमाणे आयुष्य जगता यावे, यासाठी कृत्रिम साहित्य उपलब्ध करून दिली आहे. साहित्याचे मेंटेनन्स (देखभाल व दुरुस्ती) सतत करावी लागते. लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात देखभाल आणि दुरुस्ती केंद्र नसल्याने थेट मुंबईला दिव्यांगाना जावे लागते. प्रवास करताना यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शिवाय यांच्यावर आर्थिक बोजाही पडतो. लातूर जिल्ह्यातही शेकडो दिव्यांग बंधू-भगिनी आहेत.
या सर्वांच्या सोयीसाठी लातूर जिल्ह्यात दिव्यांग केंद्र उभारून साहित्य देखभाल व दुरुस्ती तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. दिव्यांगांच्या हाल आणि अपेक्षा याकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी खंत विजय मोरे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना भावना व्यक्त केली. यावेळी मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महेश टेळेपाटील सुरक्षा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष इम्तियाज मोमीन, युवा उद्योजक अनिकेत मोरे, कालिदास जगताप, सुरज कारकर, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

रोज 60 किलोमीटरचा सायकल प्रवास :  Vijay More
लातूर ते मुंबई हे अंतर जवळपास 550 किलोमीटर आहे. विजय मोरे या दिव्यांग युवकाने 6 सप्टेंबर रोजी आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. रोज साधारणतः 60 किलोमीटर प्रवास आपण करून करून मुख्यमंत्री महोदयांना भेटणार असल्याची माहिती त्याने माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री महोदयांना दिव्यांगांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे ते मला नक्कीच भेटतील आणि माझ्या मागण्या मान्य करतील असा विश्वास विजय मोरे यांनी व्यक्त केला आहे. मी माझ्यासाठी ही लढाई लढत नसून माझ्यासारख्या अनेक दिव्यांगांचे हालअपेष्ठा पाहवत नाहीत यासाठी हे पाऊल उचलले असेही मोरे यांनी सांगितले.
‘या’ आहेत प्रमुख मागण्या :
आपल्यावर आलेली दुर्दैवी वेळ आणि आपल्यासारख्या हजारो दिव्यांगांच्या होत असलेल्या हालअपेष्टा सहन व पाहवत नसल्याने विजय मोरे हा दिव्यांग तरुण चक्क सायकलवर लातूर ते मुंबई हा प्रवास करतो आहे. कृत्रिम साहित्य देखभाल आणि दुरुस्तीसाठी लातूरला दिव्यांग केंद्र उभारण्यात यावे. सध्या दिव्यांगांना असलेल्या पाचशे रुपये या तुटपुंज्या मानधनात वाढ करण्यात यावी. दिव्यांगांच्या विकासासाठी जिल्हास्तरावर दिव्यांग महामंडळ स्थापन करावे. या प्रमुख मागणी घेऊन हा युवक मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.