Wai News: सातारा जिल्ह्यातील वाईत घरांवर दरड कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 15 नागरिकांना वाचविण्यात यश

एनडीआरएफकडून मदत कार्य सुरु ; राज्यभर पावसाचा हाहा:कार

एमपीसी न्यूज – कोकण, कोल्हापूर, सांगली, साता-यासह राज्याच्या सर्वच भागात पावसाने हाहा:कार माजविला आहे. सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विविध दुर्घटना घडत आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील देवरुखवाडी या वस्तीमधील पाच ते सहा घरांवर रात्री साडेआठच्या सुमाराला दरड कोसळली. यामध्ये रहिवासी अडकले होते. एनडीआरएफ टीमच्या माध्यमातून नागरिकांना बाहेर काढण्यात आले.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात धोम धरणाच्या लगत देवरुखकरवाडी या वस्तीवर रात्री आठ साडेआठच्या सुमाराला दरड कोसळली होती. या वस्तीवर वीस घरे असून पाच ते सहा घरांवर दरड कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली वीसहून अधिक लोक अडकले होते. त्यातील पंधरा लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

अत्यवस्थ असलेल्या नागरिकांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पावसामुळे अनेक या परिसरातील विज खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे मदत कार्यात अडचण येत होती.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भूस्खलन झाले आहे. यामुळेही चार ते पाच घरे ढिगाऱ्याखाली गेली असल्याचे सांगण्यात आले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली. ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.