Wakad Crime News : मांडूळ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – मांडूळ जातीच्या साप विक्रीसाठी सांगली येथून वाकड परीसरात आलेल्या एका तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीचा मांडूळ जातीचा साप जप्त करण्यात आला आहे.

श्रीधर संपतराव शिंदे (वय 21, रा. आंजणी ता. तासगाव, जि. सांगली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कासारसाई येथील नियतक्षेत्र वनअधिकारी सुनिल विठ्ठल भुजबळ (वय 42) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस शिपाई धनाजी शिंदे आणि गोविंद चव्हाण यांना माहिती मिळाली की, एक तरुण मांडूळ साप विकण्यासाठी डांगे चौकात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि.7) दुपारी डांगे चौकात सापळा लावला. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आरोपी श्रीधर पिवळ्या रंगाची पिशवी घेऊन डांगे चौकात आला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या पिशवीबाबत चौकशी केली. त्यात श्रीधर याने सांगितले की, त्याच्या शेतात मागील दोन दिवसांपूर्वी मांडूळ जातीचा साप आढळला असून त्याने तो विकण्यासाठी आणला आहे.

त्यावरून पोलिसांनी त्याच्या विरोधात वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा 1972 चे कलम 2(16),9,44,50,52 प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीचा मांडूळ जातीचा साप, एक पिशवी असा एकूण दोन लाख १० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.