Wakad : डांगे चौकातील ग्रेड सेपरेटर एकाच बाजूला सरकावल्याने स्थानिक व्यापाऱ्यांचा विरोध

एमपीसी न्यूज – डांगे चौक येथे सुरु असलेला ग्रेड सेपरेटर एकाच बाजूला जास्त सरकवला असल्याचा आरोप करत ग्रेड सेपरेटरच्या कामाला स्थानिक व्यापा-यांनी केला. मंगळवारी (दि. 23) सकाळी व्यापाऱ्यांनी तब्ब्ल तासभर ग्रेड सेपरेटरचे काम बंद पाडले. त्यानंतर, पोलिसांच्या मध्यस्थीने हे काम सुरू करण्यात आले.

डांगे चौक ते हिंजवडी या मार्गावर डांगे चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. या कामासाठी सुमारे 25 कोटींचा खर्च केला जात आहे. ग्रेड सेपरेटरचे काम 3 ऑगस्ट 2019 पासून सुरु करण्यात आले आहे. या ग्रेड सेपरेटरची लांबी साधारण अर्धा किलोमीटर असून 18 महिने या कामाची मुदत आहे. मात्र, हा ग्रेड सेपरेटर तयार करीत असताना रस्त्याच्या एकाच बाजूला जास्त प्रमाणात खोदकाम सुरु असल्याचा आरोप करीत व्यापारी रस्त्यावर उतरले.

त्यांनी काम करणाऱ्या मजुरांना व जेसीबी चालकांना काम बंद करण्यास सांगितले. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधून यावर सनदशीर मार्गाने तोडगा काढण्याची ग्वाही दिली. त्यानुसार येत्या गुरुवारी (दि. 26) महापालिकेचे अधिकारी आणि व्यापारी यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. वरिष्ठ निरीक्षक माने यांनी मनधरणी केल्यानंतर तब्बल तासाभरानंतर पुन्हा काम सुरु करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.