Wakad News: झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली झोपडपट्टी धारकांवर अन्याय होतोय- दिपक चखाले

झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यात येईल व सरसकट सर्वांना घरे देण्यात येतील असे सांगितले होते मात्र, अद्याप याठिकाणी काहीच काम झाले नाही.

एमपीसी न्यूज – झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली झोपडपट्टी धारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी केला आहे. 2012-13 या वर्षात वाकड येथील म्हातोबा नगर झोपडपट्टी येथे पुनर्वसन विकासक यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत येथील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यात येईल व सरसकट सर्वांना घरे देण्यात येतील असे सांगितले होते मात्र, अद्याप याठिकाणी काहीच काम झाले नसून झोपडपट्टी धारकांवर अन्याय होत असल्याचे दिपक चखाले यांनी म्हटले आहे.

सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी याबाबत पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवदेन दिले असून याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे सचिन अडागळे, सागर गायकवाड तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

दिपक चखाले यांनी या निवेदनात असे म्हटले आहे की, 2012-13 साली वाकड येथील म्हातोबा नगर झोपडपट्टी येथे झालेल्या बैठकीत सरसकट सर्व झोपडपट्टी धारकांना घरे देण्यात येतील असे आश्वासन दिले होते.

तसेच, 2 ते 3 पुनर्वसनाचे काम पूर्ण करू असे सांगून सर्व झोपडपट्टी धारकांचे अग्रीमेंट करून दिले होते. मात्र, आज सहा वर्ष उलटून गेली तरी विविध अटी घालत झोपडपट्टी धारकांना वेठीस धरले आहे.

म्हातोबा नगर झोपडपट्टीत पुनर्वसनाचे काम सुरू असल्याचे दाखवले जात असून, याठिकाणच्या सार्वजनिक शौचालय, अंतर्गत गटार यांची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता केली जात नाही तसेच वारंवार महानगरपालिकेच्या सारथी या हेल्पलाईनवर फोन करावा लागत आहे. येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चखाले यांनी निवेदनात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीमध्ये निवड झाली असून शहराबरोबर झोपडपट्ट्यांचाही सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. मात्र, पुनर्वसनाच्या नावाखाली झोपडपट्टी धारकांवर अन्याय होत असून याबाबत ठोस निर्णय घेऊन त्वरित कार्यवाही करावी अशी विनंती चखाले यांनी केली आहे.

महानगरपालिकेने याबाबत त्वरित निर्णय न घेतल्यास 31 ऑगस्ट रोजी मास्क न लावता महानगरपालिकेवर मोर्चा काढू, असा इशारा दिपक चखाले यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.