Wakad : वाहतूक पोलिसाला धक्काबुक्कीच्या आरोपावरून दोघांना अटक

एमपीसी न्यूज – नो एन्ट्रीतून आलेल्या वाहनचालकास अडविल्यामुळे त्याने व त्याच्या साथीदाराने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून धक्‍काबुक्‍की केली. ही घटना डांगे चौक येथे बुधवारी (दि. 25) सायंकाळी घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वाहतूक पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

विजय तुलसीदास शिरसाट (वय 38, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि किरण सोनूजी राठोड (वय 24, रा. रघनंदन मंगल कार्यालयासमोर, ताथवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक बाबासाहेब रामचंद्र पावसकर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पावसकर हे हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी ते डांगे चौक परिसरात कर्तव्यावर होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी किरण राठोड हा नो एन्ट्रीतून दुचाकीवरून आला. त्यास पोलिसांनी अडविले. त्यावरून तो वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालू लागला. त्यानंतर त्याने आपला साथीदार विजय शिरसाट याला बालावून घेतले. त्या दोघांनी पावसकर यांना शिवीगाळ करीत धक्‍काबुक्‍की केली.

‘आमची गाडी अडविण्याची तुझी लायकी नाही. तू कोण लागून गेला, बघून घेतो तुला तू येथे कशी नोकरी करतो. तूझी वर्दीच उतरवितो’, असे आरोपीने म्हटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी फिर्यादी पावसकर करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.