Pimpri News : मुळशी धरणातून पाणी विसर्ग वाढविला; 11,400 क्युसेकने विसर्ग

एमपीसी न्यूज – मुळशी धरण पाणलोट परिसरात पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे सायंकाळी पाचनंतर धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग 9 हजार 176  क्युसेकवरून वाढवून 11 हजार 400  क्युसेक करण्यात आलेला आहे. आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल संभवू शकतो. त्यामुळे मुळा नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मागील रविवारपासून धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील पवना, खडकवासला, मुळशी, वडिवळे, आंद्रा धरणे भरली आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या पुढील वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला आहे. पाऊस सुरुच असल्याने सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.

पाचनंतर मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग 9 हजार 176  क्युसेकवरून वाढवून 11 हजार 400  क्युसेक करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुळा नदीपात्रात कोणी उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन बसवराज मुन्नोळी यांनी केले.

पवना धरण 98.29 टक्क्यांवर

पिंपरी – चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणारे पवना धरण 98.29 टक्के भरले आहे. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. विद्युतर्निमिती (हायड्रोद्वारे) 1400 क्युसेक तर धरणाच्या सांडव्याद्वारे 2 हजार 121 क्युसेकद्वारे असे 3 हजार 521 क्युसेक पाणी सकाळी नदीत सोडण्यात येत होते. त्यामुळे पवना नदी दुथडी भरुन वाहत आहे.पवना धरण 98 टक्के भरल्याने पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.