Pimpri : ….जेव्हा आयुक्तच बैठक अर्ध्यावर सोडतात तेव्हा!

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात ‘एलईडी’ पथदिवे बसविण्याचा विषयाच्या तहकूब, मंजूर अन्‌ रद्दचा खेळ खंडोबा केल्यानंतर आज (शुक्रवारी) उर्जा संवर्धन धोरणाचे  गटनेत्यांसाठी सादरीकरण ठेवले होते. यावेळी नगरसेवकांनी सादरीकरण करणा-या एजन्सीचा पदाधिकारी आणि विद्युत विभागावर विविध प्रश्वांची सरबत्ती केली. तथापि, त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे सविस्तर माहिती घेऊनच सादरीकरण करा असे खडेबोल सुनावत आयुक्त श्रावण हर्डीकर बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले.

पिंपरी – चिंचवड शहरात उर्जा संवर्धनाच्या दृष्टीकोनातून 38 हजार 755 इतके विविध क्षमतेचे एलईडी दिवे रस्त्यांवर बसविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही 36 हजार दिवे सोडीयम व्हेपर, मेटल हालाईड या प्रकारचे आहेत. हे दिवे काढून त्याठिकाणी ही एलईडी दिवे बसविण्यासाठी ‘ईईएसएल’ कंपनीला काम देण्यात येणार आहे. ही कंपनी जुने पारंपारीक फिटींग काढून एलईडी फिटींग बसविणार आहे. फिटींगची वॉरंटी सात वर्षे आहे. यामध्ये मध्यवर्ती नियंत्रित कक्षातून दिवे नियंत्रित करणा-या यंत्रणेचा अंतर्भाव आहे. या दिव्यांच्या देखभाल-दुरूस्तीचे कामकाजही ‘ईईएसएल’मार्फत करण्यात येणार आहे.

या विषयाच्या तहकूब, मंजूर अन्‌ रद्दचा खेळ खंडोबा झाल्यानंतर आज  गटनेत्यांसाठी सादरीकरण ठेवण्यात आले होते. या बैठकीला महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, शहर सुधारणा समितीच्या सभापती सीमा चौघुले, नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्यासह विद्युत विभागाचे अधिकारी आणि ‘ईईएसएल’ संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘एलईडी’ दिव्याच्या फिटींगसाठी  ‘ईईएसएल’ संस्था 85 रुपये दर आकारणार आहे. तर, पालिका केवळ 55 रुपये आकारत आहे. त्यामुळे 85 रुपये हा दर अवास्तव असून त्याची विभागणी करुन सांगण्याची मागणी नगरसेवकांनी केली. तथापि, सादरीकरण करणा-या एजन्सीचा कर्मचारी आणि विद्युत विभागाला त्याचा खुलासा करता आला नाही. त्यामुळे संतापलेले आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सविस्तर माहिती घेऊनच सादरीकरण करा असे खडेबोल सुनावले अन्‌ बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.