Pimpri News : शहर काँग्रेसच्या बुडत्या जहाजेची कमान कोण सांभाळणार?

सहा वर्षात सचिन साठे यांचा तीनवेळा राजीनामा

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – राज्य स्तरावरील नेत्यांचे वारंवार होणारे दुर्लक्ष, कार्यकर्त्यांना ताकद न देणे, सत्ता असतानाही पक्ष वाढीसाठी कोणतेही प्रयत्न न करणे, संकटकाळात संघटनेसाठी काम करणा-या निष्ठावान कार्यकर्त्यांना पदासाठी डावलणे यामुळेच एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस आज नामशेष झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सचिन साठे यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी डावलल्याने शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सहा वर्षात त्यांनी तीनवेळा राजीनामा दिला आहे.  या कठीण परिस्थितीत शहर काँग्रेसच्या बुडत्या जहाजेची कमान कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरातून काँग्रेस नामशेष झाली. पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे काँग्रेसची अवस्था मरणासन्न झाली आहे. पालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत काँग्रेसला गळती लागली. थोडीफार ताकद असलेले तत्कालीन शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी हातावर ‘घड्याळ’ बांधले. त्यामुळे उरलीसुरली काँग्रेस अस्तित्वहीन झाल्यासारखी परिस्थिती झाली.

मागील महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाला. पालिकेत काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. यातून काँग्रेस नेतृत्वाने कोणताही धडा घेतलेला दिसून येत नाही. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या शहरात आपला एकही नगरसेवक नाही याचे कोणतेही शल्य राज्यस्तरावरील नेत्यांना वाटले नाही. शहरात पक्ष मरनासन्न झाला असतानाही राज्य स्तरावरील नेत्यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे. पालिकेची आगामी  निवडणूक वर्षभरावर येवून ठेपली आहे. त्यापार्श्वभूमीवर पक्षाकडून आमदारकी मिळेल. महामंडळाचे अध्यक्षपद देवून संघटना वाढीसाठी ताकद दिली जाईल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. पण, यावेळीही पक्षाने दुर्लक्ष केले.  राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी डावलल्याने सचिन साठे यांनी 11 नोव्हेंबर रोजी तडकाफडकी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  आपण वैयक्तिक कारणास्तव या जबाबदारीतून मुक्त होत आहे. यापुढे देखील पक्षाचे काम निष्ठेने करणार असल्याचे साठे यांनी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

साठे यांच्या राजीनाम्यानंतर महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, सेवादलाचे मकरध्वज यादव, भोसरी ब्लॉकचे अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे आणि चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ यांनीही राजीनामे दिले आहेत. पालिका निवडणूक वर्षावर आली असताना काँग्रेसमध्ये पुन्हा राजीनामा सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीला काँग्रेस कशी सामोरे जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सहा वर्षात सचिन साठे यांचा तिस-यावेळी राजीनामा!
मागील सहा वर्षांपासून साठे शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत होते. पडत्या काळात त्यांनी शहरात काँग्रेस जिवंत ठेवली. 2017 च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. स्वत: साठे देखील पराभूत झाले.  या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन त्यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतु, पक्षाने तो नामंजूर करत साठे यांना पुन्हा तीन वर्ष मुदतवाढ दिली.

त्यानंतर राज्याचे तत्कालीन प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या सन 2018 मध्ये झालेल्या बैठकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे साठे यांनी पुन्हा राजीनामा दिला. पण, तो देखील स्वीकारण्यात आला नाही. आता साठे यांनी तिस-यावेळी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून आपण राजीनाम्यावर ‘ठाम’ राहणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. आता पक्षश्रेष्टी साठे यांचा राजीनामा स्वीकारणार की त्यांचे मन वळविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शहराध्यक्षपदासाठी कैलास कदम यांचे नाव आघाडीवर!
शहरात काँग्रेसचे संघटन राहिले नाही. कार्यकर्ते पक्षापासून लांब चालले आहेत. पक्षासाठी प्रतिकूल परिस्थिती असून पक्षाचा काळ कठीण आहे. राज्यात सत्ता असतानाही वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे.  त्यामुळे पक्षाचे काम करणे जिकिरीचे आहे. साठे यांच्यानंतर आता काँग्रेसची धुरा कोण सांभाळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहराध्यक्षपदासाठी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यासोबत संदेश नवले, दिलीप पांढारकर हे देखील इच्छुक असल्याचे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.