Pune News : पत्नी अन् सासू सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिली नावे

एमपीसी न्यूज : पत्नी, सासू सासरे आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून एक व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या धनकवडी परिसरात हा प्रकार घडला. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने सुसाईड नोट लिहिली असून त्यात पत्नी, सासू सासरा आणि मेहुण्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. 

शरद नरेंद्र भोसले (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी, प्रियंका सासू नंदा, सासरा शंकर शिंदे आणि मेहुणा मनीष उर्फ गणेश शंकर शिंदे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र भोसले (वय 58, रा. धनकवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यापासून पत्नी आणि सासू सासरे शरदला त्रास देत होते. आईवडिलांच्या सांगण्यावरून पत्नी घरात लहान लहान कारणावरून भांडण करत होती. त्याच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याला शिवीगाळ करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी शरदचा मेहुणाने भांडणे मिटवण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचा मुलगा शरद याला मार्केटयार्ड परिसरात बोलावून त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती. या सर्व त्रासाला कंटाळून शरद याने 28 ऑगस्ट रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी शरदने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. त्यात सासू सासरे बायकोला नांदू देत नाहीत, तिला भडकवतात तसेच तिच्या आणि सासू सासऱ्यांचा त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.