Pimpri News: दोन दिवसीय संप व धरणे आंदोलनास कामगाराचा प्रतिसाद; 1 मे रोजी ‘पुणे ते मुंबई लॉंग मार्च’ कामगार नेत्यांची माहिती

1 मे रोजी ‘पुणे ते मुंबई लॉंग मार्च’ कामगार नेत्यांची माहिती

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने काळे कामगार कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी कामगार दिनी 1 मे 2022 रोजी ‘पुणे ते राजभवन मुंबई लॉंग मार्च’ काढण्यात येणार आहे. या लॉंग मार्चमध्ये राज्यभरातून लाखो कामगार सहभागी होतील अशी माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम यांनी केले.दरम्यान, दोन दिवसीय संप व धरणे आंदोलनास कामगाराचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

देशभरातील बारा राष्ट्रीय कामगार संघटनांनी नविन कामगार कायद्याविरोधात दोन दिवसांचा अखिल भारतीय औद्योगिक संप पुकारला होता. त्याअंतर्गत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या सर्व पदाधिका-यांनी आणि हजारो कामगारांनी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर (कौन्सिल हॉल) धरणे आंदोलन केले. या दोन दिवसीय संप व धरणे आंदोलनास कामगाराचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

हमाल पंचायतीचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव, सिटू संघटनेचे अजित अभ्यंकर, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादी कामगार सेलचे अरुण बो-हाडे, घर कामगार संघटनेच्या किरण मोघे, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शुभा शमीम, हिंद कामगार संघटनेचे यशवंत सुपेकर, भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या लता भिसे, आयटकचे अनिल रोहम, इंटकचे मनोहर गडेकर, सीटूचे वसंत पवार, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, ए.आय.बी.ए. शैलेश टिळेकर, बी.एस.एन.एल. युसूफ जकाती, ए.आय.पी.यु. अरविंद शिवतारे, अंगणवाडी कर्मचारी युनियन रंजनी पिसाळ, एम.एस.ई.बी. अनिल औटी, मोहन पोटे, शशिकांत महांगरे, विकास बगाडे, विशाल भेलकर, गोरख दोरगे, बॅंक कर्मचारी संघाचे सुनिल देसाई, सीडब्लूपीआरएसचे धनाजी गावडे, पुणे मनपा कर्मचारी युनियनचे प्रकाश जाधव, रिक्षा संघटनेचे नितीन पवार तसेच शांताराम कदम, सचिन कदम, विठ्ठल गुंडाळ, किरण भुजबळ, नवनाथ जगताप, संतोष खेडेकर, मनोज पाल आदींसह हजारो कामगार उपस्थित होते.

या आंदोलनानंतर पुणे विभागीय उपआयुक्त संतोष पाटील यांना कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव म्हणाले की, या काळ्या कामगार कायद्यांचा आणि कंत्राटी करणारा दुरगामी परिणाम सर्वच उत्पन्न गटातील नागरिकांवर होणार आहे. त्याचे गंभीर परिणाम अल्प व मध्यम उत्पन्न गटातील आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांवर होतील. त्यामुळे रिक्षा, टपरी, पथारी, फेरीवाला या वर्गातील नागरिक देखील संपात सहभागी झाले आहेत.

ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर म्हणाले की, केंद्र सरकारने केलेल्या काळ्या कामगार कायद्यांना विरोध करुन प्रचलित कामगार कायद्यांचीच अंमलबजावणी राज्यात करण्याचा अधिकार सरकार आहे. हा अधिकार महाविकास आघाडी सरकार वापरत नाही, त्यांचे वरिष्ठ अधिकारी केंद्र सरकारच्याच कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या विचारात आहेत. अधिका-यांचा हा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी सर्व कामगार संघटना एकवटल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.