Pimpri News : वाचन केल्याशिवाय लेखक घडत नाही : गिरीश प्रभुणे 

एमपीसी न्यूज – लेखक किंवा कवी होण्यासाठी दुसर्‍यांची पुस्तके वाचावी लागतात, वाचून मशागत व्हावी लागते. मी पु. शि. रेगे वाचले, मी पु.भा. भावे वाचले आणि माझ्यातला साहित्यिक घडला. साहित्य वाचनासाठी मी समाज हिंडलो आणि मला समाज कळला, आणि माझ्यातला कार्यकर्ता घडला. कामात सातत्य असल्याशिवाय कार्यकर्ता घडत नाही आणि वाचन केल्याशिवाय लेखक किंवा कवी घडत नाही. असे, विचार पद्मश्री जाहीर झालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी मसाप’च्या व्यासपीठावर मांडले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आयोजित मराठी भाषा पंधरवडाच्या समारोप प्रसंगी प्रभुणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष राजन लाखे, प्रमुख अतिथी अरुण बोऱ्हाडे , कार्याध्यक्ष विनिता ऐनापुरे उपस्थित होते.

पद्मश्री मिळाल्या बदल महाराष्ट्र साहित्य परिषद तर्फे मांडलेल्या अभिनंदन ठरावानंतर प्रभुणे यांचा पहिला जाहीर सत्कार करण्यात आला.

प्रभुणे पुढे म्हणाले, पद्मश्री मिळाल्याचा मला निश्चित आनंद आहे, परंतु ज्या समाजाने मला खूप काही दिले त्या समाजाला मला अजून भरपूर द्यायचे आहे. आणि त्यासाठी मी कार्यरत राहील. प्रभुणे यांनी मराठी भाषा संवर्धन साठी उपक्रम राबविणाऱ्या साहित्य परिषदेचे कौतुक केले. यावेळी प्रभुणे यांच्या हस्ते कवयित्री श्यामला पंडित लिखित स्वानंद आणि शब्दझुला या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

भाषा पंधरवडा समारोप कार्यक्रमात विविध कविता सादर करण्यात आल्या. टिव्हीवर सुरू असलेल्या ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेच्या मूळ लेखिका विनिता ऐनापुरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, मराठी भाषा पंधरवडय़ात सर्व कार्यक्रमांना उपस्थितीत राहिल्याबद्दल जयश्री श्रीखंडे आणि संभाजी बारणे या रसिकांचा ही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी श्रीकांत चौगुले, संजय सिंगलवार, शिवा बागुल, माधुरी मंगरूळकर, राजू गवते, इला पवार, दत्तात्रेय डांगे, विनिता श्रीखंडे, रविंद्र झेंडे, डि. एम. कुळकर्णी, अंतरा देशपांडे, रमाकांत श्रीखंडे व इतर मान्यवर उपस्थित होते. राजन लाखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी शेठ, किशोर पाटील माधुरी मंगरूळकर मंगला पाटसकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.