Pune News : तुम्ही कोकणात जाताय; तर ही बातमी वाचा

नद्यांना पूर, आंबोली घाटात पाणीच पाणी आल्यामुळे महामार्ग बंद

एमपीसी न्यूज – तुम्ही जर पुणे, सातारा परिसरातून कोल्हापूर मार्गे कोकणात जात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते. कारण कोल्हापूरच्या पुढे गडहिंग्लज जवळ नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे. आंबोली घाट देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच महामार्गावर सुमारे दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई विभागातून कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग, करुळ घाट आणि पुणे बेंगलोर महामार्ग या तीन रस्त्यांचा पर्याय असतो. मात्र मागील काही दिवसांपूर्वी करूळ घाट, मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी पुणे-बंगलोर महामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे.

दरम्यान मागील दोन दिवसात कोकणासह कोल्हापूर सातारा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीसह इतर अनेक नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूर मधील रंकाळा तलाव देखील ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर मधील बहुतांश वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच पुणे बेंगलोर महामार्गावरून कोल्हापूर मार्गे जर तुम्ही कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर थांबा.

कोल्हापूर पासून पुढे गडहिंग्लजच्या अलीकडे 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन नद्यांचे पाणी महामार्गावर आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने हा महामार्ग बंद ठेवला आहे. तसेच आंबोली घाटात देखील मुख्य धबधबा ओव्हरफ्लो झाला आहे. त्याचे संपूर्ण पाणी महामार्गावर आले आहे. त्यामुळे आंबोली घाट देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान महामार्गावर सुमारे अकरा किलोमीटर लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.