Chinchwad : ‘युवकांनी बलोपासना करणे आवश्यक आहे’

पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांचे मत

एमपीसी न्यूज – ‘शारीरिक कष्ट, बलोपासना हे विषय अलिकडे नाहीसे होताना दिसत आहेत. त्यामुळे युवकांमध्ये उदासीनता आणि गतीहीनता दिसून येते. यासाठीच संघपरंपरेनुसार राबवल्या जाणाऱ्या घोष आणि या शस्त्रपूजन उत्सवाचे विशेष महत्त्व आहे. बलोपासना हा समाजात नित्य चालवला जाणारा विषय असावा यासाठी संघ सुरुवातीपासूनच आग्रही राहिला आहे. या माध्यमातून युवकांची मनगटे आणि पर्यायाने मनही मजबूत होण्यासाठी प्रेरणा मिळावी हाच उद्देश आहे’, असे मत पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांनी केले.

चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलात विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित शस्त्रपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. शस्त्रपूजन, घोष पथक व स्वयंसेवकांची इतर प्रात्यक्षिके यांच्या सादरीकरणानंतर डॉ. कुकडे यांनी उपस्थित स्वयंसेवक व नागरिकांना मार्गदर्शन केले.

बलोपासना आणि शारीरिक श्रम याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, ‘देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या सामुहिक संघर्षाचे योगदान महत्त्वाचे म्हणूनच बलोपासना आवश्यक आहे. व्यक्तिगत आयुष्यापासून समाज, देश व विश्व म्हणून ती केली पाहिजे. राष्ट्रीय चारित्र्य व संस्कार यांचे योगदान ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपलब्धी आहे.’

याव्यतिरिक्त भारतीय संस्कृती आणि रा. स्व. संघ यांचे नाते सांगत संघाने आपल्या स्वयंसेवकांवर देशभक्तीचे संस्कार केले, असेदेखील ते म्हणाले. ‘इच्छाशक्ती असेल, तर अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात, याचे उदाहरण म्हणजे ३७० कलम रद्द होणे. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून डोकेदुखी ठरलेली ही समस्या एका संघस्वयंसेवक पंतप्रधान असलेल्या सरकारने यशस्वीरीत्या सोडवून दाखवली. भारतीय संस्कृतीने आजवर जगभरात कोणताही देश अथवा संस्कृतीवर आक्रमण केले नाही. परंतु आपल्यावर झालेली आक्रमणे मात्र देशाने वेळोवेळी परतवून लावली आहेत. याचे श्रेय काही अंशी तरी या शस्त्रपूजन परंपरेला जाते.’

हे सांगत असताना स्वयंसेवकाने कोणता आदर्श ठेवून वाटचाल केली पाहिजे, याबाबत सांगताना ते म्हणाले, ‘डॉ. हेडगेवारांनी दूरदृष्टी ठेवून सुरू केलेल्या संघकार्याने व नंतरच्या काळात असंख्य स्वयंसेवकांच्या परिश्रमाने आज आपण संपूर्ण देशाच्या अपेक्षेच्या केंद्रस्थानी आहोत. यापुढील कालखंडातही राष्ट्र जागरण आणि एकंदरीत प्रवासातील स्वयंसेवक म्हणून आपली भूमिका लक्षात घेऊन सक्रीय होणे, ही काळाची गरज आहे.’

या कार्यक्रमासाठी संघाचे काही पदाधिकारी, नगरातील स्वयंसेवक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.