Pune News : युवक बिरादरी’च्या वतीने ‘युवा भूषण’ स्पर्धा, हजारो रुपयांची बक्षिसे 

एमपीसी न्यूज – युवक बिरादरी (भारत) आणि सहयोगी संस्था यांच्या वतीने ‘युवा भूषण’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 16 ते 25 वयोगटातील देशातील युवकांना ऑनलाईन पध्दतीने या स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना हजारो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. 

युवा भूषण स्पर्धेच्या पहिल्या फेरी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होईल.
पहिल्या फेरीत 75 वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 150 गुणांसाठी सदर भागात सामान्यज्ञान, तार्कीक विचार, डेटाव्याख्या, समज, निर्णय क्षमता, समस्येचे निवारण, चालू घडामोडी, मूल्य व नागरिकता, आर्थिक साक्षरता व उद्योगशिलता आणि निरंतर विकास आदी विषयांचा समावेश असेल. तसेच, 50 गुणांच्या व्यक्तिनिष्ठ विषयासाठी स्वयंमूल्यांकन केले जाईल.
150 गुणांपैकी 100 गुण प्राप्त होणारे स्पर्धेत उत्तीर्ण ठरतील व एकूण 200 पैकी 150 गुण प्राप्त करणाऱ्या गुणवत्ताधारकांपैकी पहिले 100 द्वितीय फेरीत दि. 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 50 गुणांसाठी ऑनलाईन व्यक्तित्वाची पारख, संभाषणकला व अन्य गुणांच्या पडताळणीसाठी ज्युरी पॅनेलला चर्चेद्वारे सामोरे जातील. गुणवत्ताधारक ठरणाऱ्या सर्वांना गुणवत्ता प्रमाणपत्रे दिली जातील व द्वितीय फेरीत पदार्पण करणाऱ्या विविध जिल्ह्यांतील प्रथम दोन स्पर्धकांना रुपये 2,500 चे उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. सर्वश्रेष्ठ ठरणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे रुपये 50 हजार, 30 हजार आणि 20 हजार रुपये व उत्तेजनार्थ 5 हजार रुपयांचे किमान पाच पुरस्कार दिले जातील.

युवक बिरादरीच्या www.biradari.org संकेतस्थळावर स्पर्धेची माहिती व नावनोंदणी 25 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत करता येईल. युवाभूषण उपक्रमासाठी निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, राज्य लोकसेवा आयोगाचे दोन माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे व व्ही. एन. देशमुख, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, ‘प्रथम’ फाऊंडेशनचे माधव चव्हाण आदींचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. संचालक-सचिव म्हणून सुनील वालावलकर, निहार देवरुखकर व पंकज इंगोले यांची टीम कार्यरत असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.