Pimpri News : पतंग वाटपातून कोरोनाला हरविण्याचा संदेश

रावेतमध्ये युवा सेनेतर्फे बालगोपाळांना पतंग वाटप

एमपीसी न्यूज – कोरोना विषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने युवा सेनेच्यावतीने मकर संक्रातीचे औचित्य साधून रावेत परिसरातील बाळगोपाळांना पतंग वाटप करण्यात आले. या माध्यमातून कोरोनाला हरविण्याचा संदेश देण्यात आला. युवा सेनेचे उपजिल्हा अधिकारी दिपक भोंडवे आणि ॲड. पूजा दिपक भोंडवे यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

याविषयी अधिक माहिती देताना दिपक भोंडवे म्हणाले, आधुनिकता आणि स्मार्ट गॅजेटच्या जमान्यात आपले परंपरागत खेळ आणि संस्कृती जपणे गरजेचे वाटले म्हणून हा उपक्रम आयोजित केला. त्यास अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला.

जय जिजाऊ जय सावित्री प्रतिष्ठानच्या ॲड. पूजा भोंडवे म्हणाल्या, मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागे एक विशिष्ट अर्थ आहे. सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानात जावे लागते. यामुळे सहजच आपण कोवळ्या उन्हाचाही आनंद मिळतो. संक्रांतीच्या दिवशी आकाशात लाल, पिवळ्या, निळ्या रंगांची पतंग उडताना दिसतात.

संक्रांतीच्या काळात वातावरण थंड असतं. ऊनही फार कमी मिळतं, थंडीमुळे स्थूलपणा जाणवतो. थंडी अनेक त्वचारोगांना आमंत्रण देते. याकाळात त्वचा रुक्ष होते. म्हणूनच शरिराची हालचाल व्हावी यासाठी पतंग उडविण्याचा खेळ खेळला जातो. या काळात सूर्याची किरणे अंगावर पडली तर त्याचा शरीरराला फायदा होतो. त्वचेसाठी ही सूर्यकिरणे आवश्यक असतात, या किरणांमधून शरीराला आवश्यक व्हिटामीन डी मिळतं.

प्रभाग क्रमांक 16 कोरोना मुक्त करण्याचा संकल्प –

ही मोहिम बळकट करण्यासाठी आणि कोरोना विषयक जनजागृती करण्यासाठी ऑनलाईन चित्रकला, वक्तृत्व आणि डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याचे पत्रक देखील देण्यात आले. भविष्यात संपूर्ण प्रभाग क्रमांक 16 कोरोना मुक्त करण्याचा संकल्प उपस्थित नागरिकांकडून करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.