Nigdi : विविध गुन्ह्यातील 10 आरोपींना अटक; 21 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – निगडी पोलिसांनी 10 आरोपींना खून, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारख्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. तसेच तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 6 लाख 16 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यामुळे सात पोलीस ठाण्यातील एकूण 21 गुन्हे उघडकीस आले आहेत. 

रवी नरसप्पा रेड्डी (वय 22, रा. सुदर्शननगर, आकुर्डी) शक्तिकेश शिवकुमार प्रजापती (वय 18, रा. चिंचवड), अरबाज रियाज पठाण (वय 19), विशाल कमलाकर डोंगरे (वय 19, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) यांना अटक करत एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल, सहा जिवंत काडतूस, एक मॅग्झिन स्टील प्लेटींग व एक लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला.

तसेच प्रेम प्रकरणातून खून करुन त्याचा पुरावा नष्ट करणारे धन पठाणी कामी (वय 42, रा. चिखली), खेमराज राणा कामी (वय 25, रा. शिंदेवस्ती, रावेत. मूळ रा. नेपाळ) तसेच त्यांची साथीदार पूजा रामसिंग ढकलवार (वय 25, रा. चिखली) या तिघांना अटक करण्यात आली.

सराईत आरोपी साजन मन्नू मेहरा (वय 25, रा. देहुरोड) याला पोलिसांनी दोन पिस्तूल व सहा जिवंत काडतूस तसेच एक स्टील प्लेटींग मॅग्झिनसह अटक केले. साजन याच्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे पाच गुन्हे दाखल आहेत. या आरोपींसह पोलिसांनी लॅपटॉप चोरी प्रकरणातील आनंद त्र्यबंक इंदुकाने (वय 22, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यालाही अटक केली आहे.

या तपासामध्ये निगडी पोलीस ठाण्यातील 12, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील दोन, पिंपरी पोलीस ठाण्यातील तीन, वाकड, खडक, सांगवी आणि दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण 21 गुन्हे उघडकीस आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.