Lonavala : अपंग कल्याण निधी होणार थेट अपंगाच्या खात्यावर जमा

104 अपंगाना 18 लाख रुपयांचे होणार वाटप

एमपीसी न्यूज- अपंग कल्याण निधीमधून लोणावळा शहरातील नोंदणीकृत 104 अपंगाना प्रत्येकी 18 हजार प्रमाणे 18 लाख 72 हजार रुपयांचा निधी थेट त्याच्या खात्यात जमा केला जाणार आहे. 15 ऑगस्ट पूर्वी ही रक्कम खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीमध्ये राहणार्‍या अपंग व्यक्तीच्या कल्याणाकरिता काही निधी राखीव ठेवावा लागतो. नगरपरिषदेने शहरातील सर्व प्रभागांची पाहणी करत अपंग व्यक्तीची नोंदणी करुन घेतली आहे. या नागरिकांना निधी स्वीकारण्याकरिता नगरपरिषद कार्यालयात बोलवणे संयुक्तिक नसल्याने थेट त्याच्या खात्यात निधी जमा करण्यात येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक घेण्यात आले असून त्यामध्ये निधी वर्ग केला जाईल.

ग्रामपंचायतींनी देखील निधी वाटप करावा

शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात देखिल ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील अपंग व्यक्तींना अपंग कल्याण निधीची तरतुद करुन वाटप करणे अपेक्षित आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये ते केले जाते मात्र काही ठिकाणी अपंगांना निधी देण्याऐवजी अडवणूक केली जाते. असे न करता ग्रामपंचायती व ग्रामसेवकांनी अपंग कल्याण निधीचे वाटप वेळेवर करावी अशी मागणी ग्रामीण भागातील अपंग व्यक्तींनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.