Talegaon Dabhade : ऋतुजा मुऱ्हे हिची राष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज- पुढील महिन्यात छत्तीसगड राज्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेत सोमाटणे येथील ऋतुजा संतोष मुऱ्हे हिची नुकतीच निवड झाली. ऋतुजा ही पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष मु-हे यांची सुकन्या आहे. सोमाटणे सारख्या गावातील मुलगी थेट महाराष्ट्राच्या संघात खेळणार असल्याने गावात सर्वत्र तिचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे तिला कोणत्याही प्रकारच्या खेळाचा वारसा नाही. घरात कोणीच कधी खेळाडू राहिला नाही तरी अथक परिश्रम करून तिने ही यशश्री खेचून आणली आहे.

यवतमाळ येथे 3 ते 6 नोव्हेबर दरम्यान राज्यस्तरीय निवड चाचणी आणि स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेतून महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील संघ जाहीर करण्यात आला. या संघात सोमाटणे येथील ऋतुजा संतोष मुऱ्हे हिची निवड करण्यात आली. या स्पर्धेचा निकाल यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी घनशाम राठोड यांनी जाहीर केला.

ऋतुजा सध्या ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून अभ्यासातही ती हुशार आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या जया जोशी यांनी तिचे अभिनंदन करून कौतुक केले. तिला क्रीडा शिक्षिका वैशाली यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ऋतुजा मुऱ्हे हिला विचारले असता ती म्हणाली,”कोणतेही काम मनापासून आणि जिद्दीने केले तर यश हे हमखास मिळतेच आणि याचा प्रत्यय मला या स्पर्धेच्या निमित्ताने आला. राष्ट्रीय स्पर्धा म्हणजे माझ्यासाठी नेहमी स्वप्न असायचे परंतु यावर्षी मी मनातून ठरवले होते की, आपण महाराष्ट्राच्या संघात खेळायचं त्यासाठी कितीही सराव करावा लागला तरी चालेल आणि आज माझ स्वप्न सत्यात उतरले याचा आनंद मला सध्या शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. येत्या डिसेंबर महिन्यात छत्तीसगड येथे राष्ट्रीय स्पर्धा पार पडणा आहेत”

सोमाटणे सारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने ऋतुजा मुऱ्हे हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे वडील संतोष मुऱ्हे म्हणाले, “माझी मुलगी म्हणून तर मला अभिमान आहेच परंतु सोमाटणे सारख्या ग्रामीण भागातून तिची निवड होणे ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. कारण थ्रो बॉल या क्रीडा प्रकाराची माहितीच मुळात ग्रामीण भागात कमी आहे. मुळात हा खेळच श्रीमंताचा आहे असे म्हटले जाते. ऋतुजाच्या या यशामुळे आता हा प्रकार ग्रामीण भागात पोचला असे म्हणावे लागेल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.