Pimpri News : महापालिकेच्या 125 नगरसेवकांना मिळणार आरोग्य विम्याचा लाभ

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेतील 125  नगरसेवकांसाठी वार्षिक पाच लाख रूपयांची आरोग्य विमा योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना नगरसेवकासह त्यांची पत्नी अथवा पती आणि 21  वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू राहणार आहे. या योजनेसाठी एक वर्ष कालावधीकरिता 66 लाख रूपये खर्च होणार आहे. 

महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ 128  आहे. तर, 5 स्वीकृत सदस्य असे एकूण 133  नगरसेवक आहेत. या 133 नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, 133 नगरसेवकांपैकी आठ नगरसेवकांनी आरोग्य विमा योजनेची सवलत स्वीकारण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे 125  नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात येतो.

हा विमा नगरसेवक दाम्पत्य आणि त्यांच्या 21  वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू राहणार आहे. मार्श इंडीया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी लघुत्तम निविदाधारक इफ्को टोकीयो जनरल इन्शुरन्स को-लिमिटेड यांच्यामार्फत 18 नोव्हेंबर 2017 रोजी आरोग्यविमा उतरविला होता. दरवर्षी या आरोग्य विमा योजनेचे नुतनीकरण करण्यात येते. या विम्याची मुदत 18 डिसेंबर 2020 रोजी संपुष्टात आली आहे.

19 डिसेंबर 2020 पासून पुढील एक वर्षे कालावधीसाठी मार्श इंडीया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड यांची महापालिकेचे सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आरोग्यविम्यासाठी दरपत्रक मागविण्याकरिता महापालिका आयुक्तांनी 25 नोव्हेंबर 2020 रोजी मान्यता दिली आहे. परंतु, ई-निविदा प्रक्रीयेत एकाही ठेकेदाराने सहभाग घेतला नाही. त्यामुळे आयुक्तांनी 19 डिसेंबर 2020 ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीकरिता आरोग्य विमा योजना कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेत कार्यरत विमा ब्रोकर्सकडून तातडीने दरपत्रक मागविले. त्यानुसार, मार्श इंडीया इन्शुरन्स ब्रोकर्स यांच्यासह के. एम. दस्तुर रिइन्शुरन्स ब्रोकर, फस्र्ट पॉलीसी इन्शुरन्स ब्रोकर यांनी दरपत्रक सादर केले.

के. एम. दस्तुर रिइन्शुरन्स यांच्यामार्फत ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनीचे लघुत्तम दर प्राप्त झाले आहेत. या विमा कंपनीमार्फत आरोग्य विमा उतरविण्यासाठी 19  डिसेंबर 2020 पासून पुढील एक वर्षे कालावधीकरिता कामकाज करण्यात येणार आहे. त्यासाठी 54 लाख 10 हजार 820 रूपये अधिक 11 लाख 87 हजार 740 रूपये जीएसटी अशी एकूण 65 लाख 98 हजार 560 रूपये रक्कम ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनीला देण्यात येणार आहे. या खर्चास स्थायी समिती सभेची मान्यता घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.