Wakad : जागा भाड्याने न दिल्याने अपहरण करून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – जागा भाड्याने दिली नाही म्हणून तरुणाला भेटायला बोलावले. मात्र तो न गेल्याने त्याला जबरदस्तीने घेऊन जाऊन दहा-बारा जणांनी मारहाण केली. यात तरुण जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री आठच्या सुमारास काळा खडक झोपडपट्टी, वाकड येथे घडली. अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मल्हारी मोतीराम लोंढे (वय 28, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाळू भोसले, शाहरुख खान, अरविंद साठे, आकाश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), राहुल पवार, सूरज पवार, बुग्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), सोमा लोखंडे तसेच इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मल्हारी त्यांच्या घरासमोर उभे असताना आरोपी तेथे आले. त्यांनी मल्हारी यांना दमदाटी करून काळा खडक येथील पाण्याच्या टाकीजवळ नेले. तेथे असलेल्या आरोपी शाहरूख खान याने फिर्यादी यांना कानाखाली मारली. ‘तू काय लय मोठा झाला काय, मी भेटायला बोलावूनही तू येत नाही. तुझ्यासाठी थांबायला आम्ही काय वेडे आहोत काय, तू आम्हाला जागा भाड्याने न देता, दुस-याला देतो, तुझी मस्तीच जिरवतो’, असे म्हणून शाहरुख खान याने शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपींनी फिर्यादी मल्हारी यांना जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.