Nigdi : पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याकडून 13 वाहनांची तोडफोड; कोयत्याच्या धाकाने लूटमारही

एमपीसी न्यूज – पाच ते सहा जणांच्या टोळक्‍याने थरमॅक्‍स चौक परिसरातील 13 वाहनांची तोडफोड केली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून लूटमारही केली. ही घटना रविवारी (दि. 2) पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली.

राजेश पोपट कांबळे (वय 37, रा. आंबेडकर नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहित चंद्रकांत मुद्दे (पत्ता माहिती नाही) याच्यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चारच्या सुमारास पाच ते सहा जणांचे टोळके थरमॅक्‍स चौक परिसरात आले. त्यांनी फिर्यादी कांबळे यांना कोयत्याचा धाक दाखवून पैशाची मागणी केली. तसेच त्यांच्या खिशातील एक हजार 600 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पैसे घेतल्यानंतर टोळक्‍याने आरडा ओरडा करीत कोयता, लाकडी दांडके, दगड तसेच इतर हत्यारांनी परिसरातील तेरा वाहनांची तोडफोड केली. या घटनेतील आरोपी रोहित मुद्दे याची ओळख पटलेली आहे. पूर्वी तो याच परिसरात राहण्यास होता. 2017 मध्ये तो इतर ठिकाणी राहण्यास गेला. पूर्ववैमनस्यातून त्याने हे कृत्य केल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आरोपींनी परिसरात राहणा-या प्राणिल साबळे, सुदाम वाघमारे, बिरुदेव पारेकर, सचिन हारेल, संदीप अवसरमल, जिलानी शेख, गणेश आलेगावकर, परमेश्वर पुजारी, मोहन घनवट, बाळू गायकवाड यांच्या दुचाकी व कारचे नुकसान केले. यामध्ये एकूण 40 हजारांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी आरोपींना लवकरच अटक करू, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात वारंवार वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. मागील महिन्यात पिंपरी आणि काळेवाडी परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. टोळक्‍याकडून होणाऱ्या तोडफोडीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.